पुस्तक | अग्निपंख | लेखक | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम | माधुरी शानभाग |
---|---|---|---|
प्रकाशन | राजहंस प्रकाशन गृह | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १८९ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
आज एकविसाव्या शतकात आपण शिताफीने अवकाशाला गवसणी घालतो आहोत. नानाविध यंत्रयुक्त, अद्ययावत तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. त्याबळावर आपण देश म्हणून आपली स्वयंपूर्णता केंव्हाच सिद्ध केली आहे आणि त्यासाठी कित्येक शास्त्रज्ञ, संशोधक यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. परंतु या सगळ्याचा पाया रचून, आपल्या अवकाश संशोधनाच्या गोळ्याला आकार देऊन खऱ्या अर्थाने मूर्त केले ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी. "मिसाईल मॅन" म्हणून आपण सगळेच त्यांना ओळखतो. राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, संशोधक अशा अनेक भूमिकांमधून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. रामेश्वरम सारख्या एका छोट्या खेड्यातल्या ध्येयवादी मुलाने पाहिलेली प्रचंड मोठी स्वप्ने व ती सत्यात उतरविण्यासाठी केलेले प्रयास यांची प्रेरणादायी कहाणी त्यांचेच एक सहकारी अरुण तिवारी यांनी "अग्निपंख" मधून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
जडणघडण, सृजन, आराधन, चिंतन व समारोप अशा पाच वेगवेगळ्या विभागात डॉ. कलामांच्या आयुष्याची मांडणी त्यांनी केली आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसांचा, त्यांच्या सहवासाचा आपल्यावर किती प्रभाव पडतो व त्यातून आपले व्यक्तिमत्व कसे निखरत जाते, याची प्रचिती त्यांच्या जडणघडण मधून आपल्याला येते. वडिलांचा, मेहुण्याचा तसेच रामेश्वरमच्या भारलेल्या वातावरणातल्या प्रत्येकाचा कलामांच्या आयुष्यावर असलेला प्रभाव आपल्याला यात वाचायला मिळतो. वडिलांकडून लहानपणीच मिळालेले जीवनधडे त्यांना आयुष्यात सर्वतोपरी खंबीर बनवत गेले. दुःखाबद्दल सांगताना त्यांचे वडील म्हणतात,
"आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा. संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात."
फारसे शिक्षण नसतानाही, त्यांना उमगलेला जीवनसार त्यांनी सर्वांना मुक्तहस्ताने प्रदान केला. बालपणीच्या कित्येक सुखद आठवणी यात कलामांनी सांगितल्या आहेत. सुखसुविधा नसतानाही त्यांना कसलीच कमतरता भासली नाही व त्यातूनच त्यांच्या उज्वल भविष्याचा पाया भक्कम होत गेलेला आपल्यालाही वाचायला मिळतो.
कॉलेज जीवनात त्यांना विविध प्राध्यापकांचे मिळालेले मार्गदर्शन व त्यातून घडत गेलेला त्यांच्यातला ध्येयवेडा अभियंता आपल्याला प्रेरित करून जातो. पायलट होण्याचं स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर जे वाट्याला आले त्यात पूर्ण समर्पण देऊन त्यांनी उच्च स्थान मिळवले. रॉकेट इंजिनिअर या पदासाठी जेंव्हा त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले तेंव्हा नक्की काय प्रश्न विचारले जातील याचा अंदाज लागत नसताना, स्वतःची समजूत काढताना ते म्हणतात,
"जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे."
कसलाही विचार न करता मग ते त्याला सामोरे गेले आणि यशस्वीही झाले. माणूस म्हणून जगताना आत्मसात करता येतील अशा कित्येक गोष्टी या चरित्रात आपल्याला सापडत जातात. यश अपयश हे आयुष्याचाच भाग आहेत, त्यातून माणूस सतत घडत असतो, शिकत असतो.
"अनेकदा यश आणि अपयश यामध्ये प्रयत्नाच्या एका पायरीचा फरक असतो."
यशाचे वर्णन करताना त्यांनी सांगितलेले हे वाक्य आपसूक मनावर कोरले जाते. वेळोवेळी त्यांना सुचलेल्या विविध कवींच्या कवितेच्या ओळी यातून आपल्याला आयत्याच वाचायला मिळतात. त्यातल्या मला भावलेल्या, अतिशय प्रभावशाली कवितेच्या ओळी आवर्जून इथे नमूद कराव्याशा वाटतात,
"येणाऱ्या सर्व दिवसांसाठी तयारीत रहा
त्यांना सारखेच सामोरे जा.
जेंव्हा ऐरण होशील तेंव्हा घाव सोस
अन् हातोडा होशील तेंव्हा घाव घाल."
अनेक प्रकल्पांचे प्रकल्पाधिकारी म्हणून भूमिका निभावत असताना त्यांना आलेले अनुभव हे आपल्या आयुष्यातही आपल्याला व्यवस्थापनाचे धडे देऊन जातात. संस्थाध्यक्ष म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पांची बांधणी करताना, अधिकाऱ्यांची नेमणूक करताना त्यांनी त्यांच्यातल्या गुणांचा अचूक वापर कसा करवून घेतला हे शिकण्यायोग्य आहे. कोणतीही गोष्ट मिळवताना चुका होणे साहजिक असते पण त्या चुकांमधून आपण काय बोध घेतो हे जास्त महत्वाचे असते. अपयशामधेच उद्याच्या संशोधनाची बीजे रोवलेली असतात हे डॉ. कलाम ठामपणे सांगतात. त्यांना लाभलेल्या अनेक वरिष्ठांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला दिलेल्या पैलूंचे दर्शन आपल्याला घडते. भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातली भरारी, स्वदेशी यंत्रणा उभी करून देश स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यात आलेले यश, अपयश व अंततः साकारलेले स्वप्न हा प्रवास थक्क करून जाणारा आहे.
तरुणांना आयुष्यात नक्की काय मिळवायचे आहे, त्यासाठी आपण काय करायला हवे, प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता आपल्यातल्या अग्निला पंख देण्यासाठी डॉ. कलामांचे चरित्र नक्कीच प्रेरणादायी ठरते. नियोजन, व्यवस्थापन, मूल्यमापन अशा कित्येक रोज उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आपल्याला यातून शिकायला मिळतात. जीवनाबद्दल सांगताना ते म्हणतात,
"जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वत्वाची जाणीव ठेवल्याशिवाय तो जिंकणे शक्य नाही."
आंतरिक सुखाच आपल्या आयुष्यात असलेलं अनन्यसाधारण महत्त्व ते आपल्याला पटवून देतात.
एकंदरीतच ध्येयवेड्या मनुष्याची ही गाथा आहे जी आपल्याला युगानुयुगे प्रेरित करत राहील. त्यांना लाभलेल्या त्र्याऐंशी वर्षातील केवळ साठ वर्षातल्याच गोष्टी त्यांनी यात सांगितल्या आहेत. तदनंतरही त्यांनी बऱ्याच गोष्टी साकारल्या आहेत. राष्ट्रपती, भारतरत्न यासारख्या महत्वाच्या घटना पुस्तकात आढळत नाहीत पण त्या जनसामान्यांपर्यंत नक्कीच पोहोचल्या आहेत. अवश्य वाचावं असं हे पुस्तक आपल्या संग्रहात असायलाच हवं कारण त्यातून मिळणारं बळ, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अखंड प्रगती करण्यासाठी उद्युक्त करत राहील यात शंका नाही.