माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरियन | Mazahi Ek Swapna Hote - Varghese Kurien | Marathi Book Review

माझंही-एक-स्वप्न-होतं-वर्गीस-कुरियन-Mazahi-Ek-Swapna-Hote-Varghese-Kurien-Marathi-Book-Reviews
पुस्तक माझंही एक स्वप्न होतं लेखक वर्गीस कुरियन | सुजाता देशमुख
प्रकाशन राजहंस प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २१८ मूल्यांकन ४.८ | ५

सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि देशावर आत्यंतिक प्रेम, असा माणूस मिळणे दुर्मिळच. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना तर आपण ओळखतोच, त्यांच्यासारखेच आणि त्याच दूरदृष्टीने काम केलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक आहे. आपण सगळेच स्वतः भोवतीच घोंगावत असतो, स्वतःसाठी जगत असतो. या साऱ्याचा परीघ ओलांडून, त्या पलीकडे आपलं आस्तित्व सिद्ध करणारा हा दैवी माणूस मात्र अनेक लोकांना महित्सुद्धा नाही याचं खरच वाईट वाटतं. 'आणंद, अमुल, ऑपरेशन फ्लड' अशी अनेक नावे ज्यांनी स्वबळावर जगभरात पोहचवली, ज्यांना भारतीय धावलक्रांतीचे जनक म्हणून ओळखतात, 'Milk Man of India' म्हणजेच पद्मविभूषण डॉ. वर्गीस कुरियन.

भारताला जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन करणाऱ्या देशाचा मान मिळवून देण्यात डॉ. कुरियन यांचा खूप मोठा वाटा आहे. हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र आहे. एका सरकारी शिष्यवृत्तीद्वारे अमेरिकेला दुग्धोत्पादन शिकण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची ही एक गोष्ट आहे. मूळ मेकॅनिकल अभियंता असणारे डॉ. कुरियन यांच्या प्रवास खूपच वेगळा आणि खडतर आहे. स्वतःसाठी पैसे कमवून कोट्याधीश होण्यापूर्वी त्यांनी देशासाठी जगण्याचा निर्णय घेतला. भारतात परत आल्यानंतर "आणंद" हा प्रकल्प त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत मिळून यशस्वीपणे राबविला. तसेच "अमुल" ची सारख्या जगविख्यात संस्थेची निर्मिती केली. यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनीच गरिब शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था उभारल्या आणि त्यांना योग्य तो मोबदला मिळवून दिला. स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला जुन्या रुढी आणि व्यवसाय प्रणालीतून खऱ्या अर्थानं डॉ. कुरियन यांनी स्वतंत्र केलं अस म्हटलं तर वावग ठरणार नाही.

जगात सर्वत्र असफल झालेला, म्हशीच्या दुधापासून पावडर उत्पादन प्रकल्प, त्यांनी जिद्दीने, चिकाटीने आणि हुशारीने सफल केला आणि भारताला एका उंचीवर नेऊन ठेवलं. असे अनेक विक्रम नावावर असणारा हा माणूस समजून घेताना नक्कीच भरून पावलो असाच मानस होतो.'विलक्षण द्रष्टेपण, बांधिलकी, निष्ठा आणि राष्ट्रीयत्वाची ज्वलंत भावना असणारे एक हजार कुरियन मिळते, तर आपला देश आज कुठल्या कुठे असता,' हे श्री. रतन टाटा यांचं विधान मनास एक बारीक चिमटा देऊन जात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकल्याणाचा विडा उचललेल्या अशा माणसंच कौतुक कितीही केलं तरी ते थोडेच आहे.

सुजाता देशमुख यांनी पुस्तकाचा अनुवाद अगदी उत्कृष्ट केला आहे. हे शिवधनुष्य त्यांनी अगदी सहज आणि सुरेख पेललं आहे. समाजासाठी संपूर्ण जीवन वाहून देणारा हा माणूस दैविच म्हणायला हवा. पुस्तकातील शेवटचं पत्र मात्र तुमच्या मनावर शब्दानिशी घाव करतील. ते आजूनही माझ वयक्तिक आवडतीच पत्र आहे. अब्राहम लिंकन यांनी लिहलेल्या पत्रा इतकंच ते सुरेख आहे, सुंदर आहे आणि भारताच्या नागरिकत्वाची जाणीव करून देणार आहे. गरिबांसाठी तीळ तीळ तुटणाऱ्या त्यांच्या जिवाचं, विराट मनच ते एक उत्तम उदाहरण आहे. पुस्तक नक्की वाचा, तुम्ही ही, भारताला महासत्ता बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केलेल्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला जाणून घ्या.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form