पुस्तक | मुसाफिर | लेखक | अच्युत गोडबोले |
---|---|---|---|
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ३७५ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
धगधगत्या सूर्याने प्रकाश मिळतोच पण त्याच्या तेजाने अनेकांना त्रासही होतो.. प्रकाश देण्यासाठी सूर्यच व्हावं असं जरूरी नाही.. असच एक व्यक्तिमत्त्व ज्याने अगदी मवाळ पणती होऊन सर्वांना प्रकाश दिला.. ज्योतीने ज्योत प्रज्वलित करत प्रकाश सर्वदूर पसरवला.. आणि कोणत्याही जवळच्या व्यक्तीला त्याचा त्रासही झाला नाही. ती पणती म्हणजे अच्युत गोडबोले.
सोलापूरच्या एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या या अवलियाची कहाणी म्हणजे मुसाफिर. हे पुस्तक वाचून माणूस जिद्दीने पेटला नाही तर नवलच. आयुष्यात आलेल्या सगळ्याच चांगल्या वाईट घटनांना उजाळा देत हे पुस्तक त्यांची एक जिद्दी, लढाऊ आणि शिकावू मनोवृत्तीची पोचपावती देते. लहानशा गावात वाढताना झालेले संस्कार, शिक्षणाचे विलक्षण वेड, स्वतःच्या अस्तित्वाची धडपड तसेच समाजाशी जोडली गेलेली एक नाळ.. त्यातून प्रत्येक कलेविषयी, भाषेविषयी, संगीताविषयी चा आधार वा भान त्यांना सगळ्यांपासून वेगळं बनवत. श्रीमंत बनवत व एक अवलिया कलाकाराची मोहर त्यांच्यावर आपोआपच उमटते. पुस्तकांप्रति प्रेम तसेच जीवनावर आणि मानवतेवर प्रेम त्यांची कहाणी अजूनच सुरेख बनवते.
या पुस्तकात तुम्हाला जगण्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन पाहायला मिळेल, पुलंनी म्हटल्याप्रमाणे "प्रेमात पाप नाही" याची अनुभूती येईल. आणि सर्व क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांचे काम समजून घेताना तुम्हाला भरून पावेल. त्यांची ती अक्षय विविधता (Infinite Variety) तुम्हाला नक्कीच प्रसन्न करेल त्याच साैंदर्य नक्कीच भुलवत ठेवेल. आणि त्यांचं चिरतरुण साैंदर्य त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला भेटेल, बिलगेल आणि सुखाची एक लाट समजाच्या उत्कटतेचा तिढा घेऊन पुढ्यात येईल. आव्हांनाचे असे सुगंधी अत्तर लावून जगलेल्या माणसाने काही क्षण आपल्याला या पुस्तकाद्वारे दिले आणि तेही मराठी भाषेतून, हे आपल्या मराठी जनतेचे भाग्यच म्हणायला हवे.
अच्युत गोडबोले यांबद्दल बोलावे तितके कमीच.. आणि यातच त्यांनी ऑटीझम असलेल्या अनेक मुलांसाठी केलेले काम आपण विसरू शकत नाही. त्यांनी त्यांचा संपूर्ण जीवनपट या पुस्तकात मांडला आहे.. आणि तो त्याहूनही कितीतरी मोठा आहे हे तुम्हाला जाणवेलच. "तो जगदात्मा दशांगुळे उरला" त्याचप्रमाणे त्यांचं आयुष्य आपल्याला आजूनही नीट समजलेलं नाही असं सतत वाटतं राहतं. त्यांच्या या कामाबद्दल आपण फक्त त्यांचे आभार मानू शकतो आणि असेच अधिकाधिक अनुभव त्यांकडून मिळावेत अशी आशा बाळगू शकतो. त्यांच्या या पुस्तकाचे माझ्या मनातले स्थान नक्कीच खूप मोठे आहे. आणि तुमच्याही मनात ते नक्कीच घर करून राहील याची शाश्वती देतो.