पुस्तक | चंद्राची सावली | लेखक | नारायण धारप |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १०० | मूल्यांकन | ४.५ | ५ |
"नारायण धारप" या लेखकाबद्दल आजवर खूप ऐकलं होत पण काही कारणास्तव त्यांची पुस्तकं माझ्या वाचनात येत नव्हती वा आली नाहीत. पण आज रोहन प्रकाशन च्या निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा एक संचच माझ्या हातात पडला आणि २-३ तासातच मी त्यातलं एक पुस्तक वाचुन काढलं. "हृषीकेश गुप्ते" सारख्या गुणी लेखकाची प्रस्तावना वाचल्यानंतर मला धारपांबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहित झाल्या, त्याबद्दल गुप्तेंचे देखील आभार. गुप्तेंच्या म्हणण्यानुसार आज झपाट्याने बदलणाऱ्या जगातसुद्धा भयकथांना मराठी साहित्यात म्हणावं असं स्थान मिळत नाही, आणि मलाही यात काही वावगं वाटत नाही. भयकथा, गूढकथा याकडे बऱ्याचदा बालसाहित्य म्हणून पाहिलं जात असावं असा माझा कयास आहे (ठाम मत नाही). मात्र भीती हा असा प्रकार आहे कि त्याला कसलही बंधन नाही, वयाचं तर नाहीच नाही. भयकथा तुमच्या मनावर अखंड (पुस्तक वाचताना) राज्य करतात हे जरी खरं असलं तरी त्यातली उत्कंठा हि नेहमीच वाचकाला जागृत ठेवते. आता पुढे काय? ह्या चिकित्सेपोटी अशी पुस्तकं पटकन वाचून देखील होतात. "चंद्राची सावली" हि कादंबरीच मुळात छोटी असल्याने ती एका दमात वाचून काढणं मला शक्य झालं आहे.
छतारीया इस्टेट मध्ये घडणारी हि कथा पदोपदी वाचकांच्या मनाचा ठाव घेत असते. तिथे असणारी एक अचेत शक्ती कुठल्याही प्रकारचं जीवन तिथे फुलून देत नाही. कुठलाही सजीव त्या इस्टेटीच्या आसपासच्या जागेत जिवंत राहत नाही, चांदण्या रात्री ती येते आणि तिथल्या हलणाऱ्या, जिवंत प्राण्याला आपल्या कह्यात घेते. एकदा का तिचा अंमल त्या प्राण्यावर झाला कि मग काय त्याची यातून मरणानंतरही सुटका होत नाही. प्रत्येक चांदण्या रात्री हा मरणानंतरचा खेळ तिथल्या एका टेकडीवर चालत राहतो. एकूण चार मॅनेजर त्या इस्टेटीवर एकापाठोपाठ नेमल्यावर निघून तरी गेले किंवा त्यांचा काही तपास लागला नाही. काहीजण तिला हाकमारी म्हणत, काही हडळ तर काही अजून काय काय. गावातला कुठलाही माणूस त्या भागाच्या आसपास फिरत नसे आणि अशातच नोकरीची अत्यंत गरज असताना आनंद गोसावी नावाच्या मॅनेजरची तिथे नेमणूक होते. एकंदर सगळया प्रकारची कल्पना देऊनसुद्धा फक्त गरज म्हणून तो या नोकरीसाठी तयार होतो.
हि नोकरी स्वीकारण्याआधी आधीच्या मॅनेजरांचा पत्रव्यवहार अभ्यासून तो आपल्या कामाची आखणी करतो. गोसावीला ह्या सगळ्या प्रकाराचा छडा लागतो का? कि फक्त पैशांसाठी कोणीतरी उभारलेलं हे कुभांड आहे? आणि जर असा प्रकार असेलच तर त्याच कारण काय असेल? असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर धारपांनी आपल्या लेखणीतुन "चंद्राची सावली" या कादंबरीतून दिली आहेत. संवादातून उलगडत जाणारी भयकथा हि या कादंबरीची खासियत आहे असं मला जाणवलं. एक अनामिक भीती आपल्या मनात रेंगाळत राहते मात्र तिचा कुठलाही दूरगामी ठसा आपल्या मनावर उमटेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ज्या वाचकांना भीतीदायक स्वप्नं पडण्याची भीती वाटते ते देखील या कथेचा आनंद घेऊ शकतात.
एक सहज सहज घडत जाणारी घटना आणि त्याला धारपांनी दिलेली भयाची झालर यांनी हि कादंबरी रंगली आहे. खूप कमी वेळात पण प्रभावशाली वाचण्यासाठी तुम्ही ह्या पुस्तकाची निवड करू शकता. भाषेचा उत्तम आणि सहजी लहेजा वाचकांना बांधून ठेवण्यास समर्थ ठरला आहे. तसेच एक नियोजनात्मक शेवट लाभल्यामुळे कथेला चांगला उठावही प्राप्त झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर भयकथांचे चाहते असाल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. आणि तुमचा त्याच्याबद्दलचा अनुभव आम्हाला कळवला पाहिजे.