पुस्तक | पुरुष | लेखक | जयवंत दळवी |
---|---|---|---|
प्रकाशन | मॅजेस्टिक प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ७० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
सामाजिक समस्यांवर मराठी साहित्यात अनेक लेखकांनी भाष्य केलं आहे. त्यातीलच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे "जयवंत दळवी". त्यांनीं आपल्या नाटकांतून अनेक प्रकारचे विषय हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या नाटकात लेखकाने बलात्कार.. स्त्री स्वातंत्र्य.. जातीय विषमता.. अहिंसा.. शैक्षणिक असमर्थता व पुरुष प्रधान संस्कृतीचे विविध रंग व त्यांच्या छटा. या सर्वांच्या एका विशेष अनुभवातून साकार होणारे हे नाटक आपल्याला अंतर्मुख करते व विचार करायला भाग पाडते.
अनेक दशकांपूर्वीची जरी ही कथा असली तरीदेखिल, आताच्या परिस्थितीला अगदीं तंतोतंत लागू पडते.. पुस्तकातला शब्द नि शब्द अंगावर शहारे आणतो. जयवंत दळवी यांची लेखनशैली विशेष भुरळ घालते. थेट भिडणारे शब्द मनावर घाव करून जातात. अंबिका (अंबु) कथेची नायिका.. आणि तिचा प्रियकर.. क्रांतिकारी, बंडखोर सिद्धार्थ, हळू हळू कथेचा ढाचा उलघडत जातात. सोबतीला असणारे तिचे वडील (अण्णा). एक हुशार शिक्षक.. नाकासमोर चालणारं व्यक्तिमत्त्व. ज्यांना स्वतःची मतं आहेत. आणि त्याच प्रकारे स्वतः लग्न करतात. हे वाचताना लक्षात येईलच.
एक एक पात्र काहीतरी विशेष घेउन येतं. त्याचा परिणाम समजायला तुम्हाला लक्षपूर्वक पात्राची भूमिका समजून घ्यायला हवी. अंबु, अण्णा, गुलाबराव, सिद्धार्थ.. हे जरी मध्यवर्ती असले, तरीही तारा, मथू, बंडा याही भूमिका तुम्हाला काहीतरी देऊन जातात. यातील काही वाक्य माझ्या काळजाला अजून कुरतडत आहेत. ती मी खाली देत आहे.
"अन्यायाविरुध्द लढा. या लढ्याच एक बरं असतं.. दुसरे लोक तो तीसऱ्याने द्यावा असं सांगत असतात."
"तु दलित म्हणून तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चिडायचास.. सगळ्या अन्यायाविरुद्ध बंड करायला पाहिजे असं म्हणायचास. पण तू अन्यायाविरुध्द नहीयेस सिध्दार्थ! तू फक्त तुझ्यावरच्या, तुझ्या जतीवरच्या, अन्यायाविरुद्ध आहेस. बंडखोर विद्रोही कुणीही नाहियेस. कुठल्याही सामान्य पुरुषाइतकाच सामान्य आहेस तू."
"साखर संडासात खाल्ली म्हणून काय ती गोड लागत नाही का?"
"कायद्याची सुधा कशी गंमत असते नाही? उद्या एखाद्या दरोड्याखोरानं दरोडा घातला, तर तो आपण घातला नाही, हे कोर्टात त्याला सिध्द करावं लागतं. बलात्कारचं नेमक याच्या उलट असतं बघ. आपल्यावर तो झालाय, हे आपल्याला सिध्द करावं लागतं."
"उद्या काय या गुलाबरावाला गोळ्या घालून ठार मारायचा? उद्या त्याची माणसं आम्हाला गोळ्या घालतील. म्हणजे शेवटी गोळ्या कोणाकडे जास्ती येवढाच प्रश्न शिल्लक राहतो. कायद्यानं प्रश्न सुटत नाहीत.. कायदा हाती घेऊन प्रश्न सुटत नाहीत. मग हे प्रश्न सुटणार तरी कसे? आणि कधी?"
"पुरुष" नावातच कथेची जाणीव असली तरी, पुरुषाच्या प्रत्येक छटेसोबत, संस्कृतीची विविधांगी पडताळणी.. त्यातील बारकावे.. व सुधारणेच्या आड येणारे, व्यावसायिक विचार.. लेखक "जयवंत दळवी" यांनी केली आहे. आता इतकं पाहिल्यावर मला वाटतं तुम्ही हे पुस्तक नक्की वाचालंच. तुम्ही जर हे पुस्तक आधीच वाचलं असेल, किंवा नाटक पाहिलं असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.