पुस्तक | साठे फायकस | लेखक | नारायण धारप |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २७७ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
आपण या पृथ्वीवर कसे आलो, विकसित झालो आणि बुद्धिमतेच्या जोरावर कसे राज्य करायला लागलो याबद्दल बरीचशी माहिती विज्ञानाच्या जोरावर आपल्याला माहित आहे. परंतु आपल्यासारखे कितीतरी जीव आपल्या उत्पत्ती आधीपासूनच या ग्रहावर राहत आहेत, काही काळाच्या ओघात नामशेष झाले तर काही परावर्तित होऊन टिकून राहिले. परिवर्तनाच्या या भूमिकेलाच डार्विनने उत्क्रांती ही नाव दिले. मानवाच्या उत्क्रांतीबद्दल आपल्याला ज्ञात आहेच पण जर या जीवांच्या उत्क्रांतीबद्दल समजल तर आपण अजून प्रगती करू शकतो. मात्र हा झाला केवळ एक विचार पण त्याची सत्यात उतरण्याची शक्यता ही तिळमात्र आहे, हेही आपण जाणतो. नारायण धारप यांनी असाच एक विषय घेऊन "साठे फायकस" नावाची थरारक कादंबरी लिहिली आहे. तीन भागात रंगलेली ही कथा तुम्हाला निसर्गाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.
सिमारिया रेंजच्या पाईपलाइन प्रोजेक्टसाठी कामाचा अल्प अनुभव असलेल्या एका सुपरवायझरची नियुक्ती भारत कन्स्ट्रक्शन कंपनी करते. आदिवासी भागात असलेला हा प्रोजेक्ट कंपनीसाठी फार महत्वाचा असला तरी तिथे अनेक संकटे हात जोडून उभी असतात. अनेक रहस्यमय अनुभव जंगलाच्या विशिष्ट भागात काम करताना आलेले असतात, दोन कामगारांचा त्यात आधीच मृत्यू ओढवलेला असतो. आणि अशातच या साठे नामक व्यक्तीची तिथे सुपरवायझर म्हणून नेमणूक होते. काम चालू करण्याआधीच तिथले संभाव्य धोके साठेंना कामगारांकडून कळायला सुरवात होते. मात्र मोठ्या साहेबाच्या म्हणण्यानुसार त्या सगळ्या भाकडकथा आहेत व काम चुकवण्यासाठी वा तिथल्या विस्थापित आदिवासींनी पेरलेल्या आहेत. हाच सल्ला ते साठेंना देतात व काम सुरु करायला सांगतात. काहीच दिवसात साठेंना तिथल्या विचित्र गोष्टींचा अनुभव यायला सुरवात होते. जंगलात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या फायकस झाडांच्याबद्दल साठेला शंका आणि कुतूहल वाटू लागतं. अन अशाच एके दिवशी हि झाडे आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांची भाषा आपल्याला कळत आहे हे साठेंना समजतं. खरंतर हि झाडे ते जंगल वाचवण्यासाठी मानवाच्या विरोधात उभी ठाकलेली असतात. सुदैवाने साठेला त्यांची भाषा कळत असल्याने त्याचा जीव वाचतो कारण हे सगळं थांबवण्याच आश्वासन तो या झाडांना देतो. दुसऱ्या दिवशी सहगल साहेबांना घेऊन साठे झाडांशी बोलायला येतो परंतु धोक्याची जाणीव होऊनही साहेब ऐकत नाही आणि आपल्या प्राणाला मुकतो. आधीच भयाच्या सावटाखाली वावरणारे कामगार या प्रसंगाने हादरून जातात. यापुढे साठे काय भूमिका घेतात? काम बंद पडतं का? झाडांच्या शरीरात इतकी शक्ती कुठून आली? हे सगळं पहिला भाग वाचल्यावर आपल्या लक्षात येईल.
दुसऱ्या भागात साठे निवृत्त झाला आहे. डॉ. सेन या शास्त्रज्ञाची पहिल्या भागात ओळख झाल्यानंतर व सोबत काम केल्यामुळे साठे आणि सेन यांचे संबंध दृढ होतात. कांचन माहेश्वरी या भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकाच पत्र एक दिवस साठेंना येतं आणि घटनाक्रम वेग घेतो. कांचनची शंका मिटवण्यासाठी डॉ. सेन, साठे आणि कांचन तिघे मिळून एक शोधमोहीम राबवतात. साठे हा मानव आणि फायकस मधला एकमेव दुवा असल्याने तो या दोघांना सोबत करतो. ह्या शोधमोहिमेत त्यांच्या हाती काय लागतं? मृत्यूशी सामना करून ते सहीसलामत माघारी येतात मात्र फायकस वृक्षांना प्रचंड हानी पोहोचते. अनादी काळापासून पृथ्वीवर वास्तव्य करणारे, अनेक हिमयुगे, वादळे, पूर, भुकंप यांतही टिकून राहणारे फायकस इतके शक्तिशाली आणि सामूहिकरित्या काम करत असूनही असं का होतं? याच उत्तर आपल्याला दुसऱ्या भागात मिळतं.
फायकसचं जंगल जवळपास नष्ट झाल्यावर हे तिघे आपला शोध कसा चालू ठेवतात, ह्या सगळ्याची सुरवात करणारा साठे पुन्हा फायकस उभे करतो का? कांचनला आणि डॉ. सेनला जे हवं असतं ते मिळतं का? मानव आणि फायकस मधला अटळ संघर्ष टळतो का? ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण नारायण धारपांनी कथेच्या तिसऱ्या व अंतिम भागात केलेलं आहे. तसूभरही आपलं लक्ष न हटवणारी हि चित्तवेधक कथा आपल्याला निसर्गातल्या अद्भुत गोष्टींच्यानजीक घेऊन जाते. धारपांनी जरी कल्पनेतून हे साकारलं असलं तरी असं काहीतरी हयात असू शकतं; हा विचार आपल्याही मनाला चाटून गेल्याशिवाय राहत नाही. गूढकथांना थरारक बनवण्याचा हातखंडा असणारा लेखक आणखी एका वेगळ्या विषयातून आपल्याला भुरळ घालतो. निसर्गाला ग्राह्य धरून जगणाऱ्या माणसाला निसर्ग किती क्रूर असू शकतो याची एक हलकीशी छटा लेखक दाखवतो. धारपांच्या अनेक कथांपैकी मला सगळ्यात जास्त आवडलेली हि कथा असून, त्याचा थरारक अनुभव तुम्हीही नक्की घ्यावा; असं मला वाटतं. हे पुस्तक वाचल्यानंतर चुकुन जर का झाडं तुमच्याशी बोलतायत असा भास तुम्हाला झाला तर ती ताकद धारपांच्या लेखणीची आहे, एवढं लक्षात असू द्या.