| पुस्तक | हद्दपार | लेखक | श्री. ना. पेंडसे |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मिहाना पब्लिकेशन्स | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | १५१ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
फार कमी पुस्तक अशी असतात जी मनाला अचंबित करून सोडतात आणि कैक काळ त्यांचं वास्तव मनाच्या गाभाऱ्यात टिकून राहतं. नुकतंच श्री. ना. पेंडसे यांचं "हद्दपार" नावाचं पुस्तक वाचनात आलं आणि एका बैठकीत वाचून पूर्णही झालं. श्री. ना. पेंडसेंची गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत अशी काही निवडक पुस्तके आपल्या सहज वाचनात येतात मात्र हद्दपार सारख्या पुस्तकांसाठी आपल्याला थोडा शोध घ्यावा लागतो.
कोकणातल्या एका खेड्यातल्या मास्तरांची हि कथा अनेक अंगांनी आपल्याला भारावून टाकते. पूर्वीच्या संपन्न कुटुंबातून दारिद्रयाकडे वाटचाल केलेलं मास्तरांचं जीवन आपल्याला प्रभावित करतं. मास्तरांची शिकवण्याची पद्धत, मुलांप्रती असलेली असीमित माया, त्यांच्या भविष्याची आईबापापेक्षा जास्त असणारी काळजी इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही योगदान देत मास्तर गावातल्या प्रत्येकाचं आयुष्य संपन्न करतात. माणूस कितीही गुणवान असला तरी जगण्यासाठी त्याला हवा असतो तो पैसा! एकेकाळी बक्कळ असणारा पैसा मास्तरांना मात्र फार कष्टाने कमवावा लागे. मास्तरांच्या या दरिद्री अवस्थेमुळे हातचा मुलगा उपचाराअभावी दगावतो. तिथून पुढे मास्तर आणि त्यांच्या पत्नी यांच्यातील संबंध बिनसायला सुरवात होते.
स्वतःचा मुलगा गेला तरी गावातल्या कितीतरी मुलांच्या आयुष्यात मास्तरांनी क्रांती घडवली होती. अनेक मातीच्या गोळ्यांना योग्य दिशा देऊ केली होती. पण अनेकदा अशा चांगल्या लोकांना आडकाठी करणारे समाजकंटक अवतीभोवती वावरत असतात. मास्तरही या लोकांच्या विळख्यातून सुटले नाहीत, मात्र मास्तरांचा स्वाभिमान या सगळ्यावर मात करून जातो. हे पुस्तक वाचताना आपण मास्तरांसोबत इतके गुरफटून जातो कि नकळत आपण त्या सर्व गावगाड्याचा भाग बनून जातो. असं हे सुंदर पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. हल्ली हरवत चाललेला माणुसकीचा झरा, संवेदनशीलता आणि आपल्याच विद्यार्थ्यांप्रती असणारी आत्मीयता आपल्याला या पुस्तकात ओतप्रोत भरलेली दिसते.
शिक्षणाचा झालेला बाजार, विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड अशा कित्येक विषयांवर मात करणारा मास्तरांचा स्वभाव आपल्याला चांगला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देतो. कोकणाचं संपन्न वर्णन वाचत असताना तिथल्या मातीतली माया आपल्यालाही नकळत गोंजारून जाते. श्री ना पेंडसेंची हि अभूतपूर्व कादंबरी आपल्या घरात असायलाच हवी असं मला वाटतं. जगण्याची कितीतरी मूल्ये जी आज विरत चालली आहेत ती ठळकपणे आपल्यासमोर उभी राहतात. तुम्हीही त्याचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं म्हणून हा परिचय लिहण्याचा अट्टहास आज केला. तुम्हीही तुमचं मत आम्हाला कळवा आणि या पुस्तकाचा मनापासून आनंद घ्या.
