| पुस्तक | तुंबाडचे खोत: खंड २ | लेखक | श्री. ना. पेंडसे |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मिहाना पब्लिकेशन्स | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | ८६४ | मूल्यांकन | ५ | ५ |
तुंबाडचे खोत भाग एक वाचल्यानंतर एक अनामिक ओढ आपोआपच भाग दोन कडे खेचू लागते. मन चिमापा, नरसू, ताई, ओड्डल, गुलाब इत्यादींभोवती फिरत राहतं. बजापाच्या जाण्याने तयार झालेली पोकळी खोत कुटुंब कशी भरून काढतं? चिमापा आणि नरसू यांचं मनोमिलन होतं का? चिमापा आणि ओड्डलचा कौटुंबिक कलह खोत कुटुंबाचा ऱ्हास करतो का? अशे नानाविविध प्रश्न मनाला भेडसावत राहतात. आणि न राहून शेवटी भाग २ वाचून संपवणं अनिवार्य होऊन जातं.
भाग एक मध्ये आपण खोतांचा उदय, भरभराट, ऱ्हास आणि पुन्हा भरभराट असा प्रवास अनुभवतो तर भाग दोन मध्ये त्या भरभराटीतून जन्मलेला कुटुंब कलह व त्यातून झालेली वाताहत आपल्याला अनुभवायला मिळते. एकीकडे चिमापाची तालुक्याला पुढारी म्हणून झालेली बढती, त्याचा वाढत गेलेला प्रभाव तर दुसरीकडे घरात बाप म्हणून आलेलं अपयश, अनंत आणि ताराच्या आयुष्याला अनायासे मिळालेलं वळण चिमापाच्या पात्राबद्दल खूप काही सांगून जातं. वाचकांना सुरवातीला त्याच्याबद्दल वाटणारा रोष नंतर सहानुभूतीमध्ये बदलू लागतो. नरसू सारखं तेवढ्याच ताकदीचं दुसरं पात्र आपल्याला अखंड त्याच्याभोवती खिळवून ठेवतं. चिमापा-ओड्डल वाद मिटवण्याचा अतोनात प्रयत्न करूनही त्यात त्याला यश मिळत नाही. गांधी-सावरकर विचारात अडकलेला नरसू आपल्यालादेखील संभ्रमात टाकतो. सगळ्या घराचा आधार असलेली ताई आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. सहनशीलतेचा परमोच्च बिंदू म्हणून ताईकडे आपण पाहू लागतो.
अनंताचा झालेला ऱ्हास, तारांची झालेली हेळसांड, ताईची घुसमट आणि नरसूची हतबलता आपल्या मनाला पोखरून जाते. स्वातंत्र्य चळवळ आणि गावाचा डोलारा सांभाळणारा नरसू आपल्याच घरात हतबल होतो. आपला मुलगा मधू आणि सुनबाई यांच्यातला तणाव तो मिटवू शकत नाही. एकंदर दोन्ही खोत घरांचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे नरसू आणि चिमापा काही करू शकत नाहीत. मानवी भावनांचं विदारक आणि समृद्ध चित्रण आपल्याला या कादंबरीच्या निमित्ताने वाचायला मिळतं. प्रत्येक पात्रासोबत एक घरोब्याची भावना आपल्याही मनात रुजू लागते. नकळत का होईना एक संबंध या खोतांशी आपण जोडू पाहतो. इतके प्रसंग, इतक्या घडामोडी मराठी भाषेत इतक्या ताकदीने मांडलेल्या क्वचितच पाहायला मिळतात. तुंबाडचे खोत या कादंबरीचे दोन्ही भाग विशेष आहेत ते तुम्हाला अगदी शेवटपर्यंत गुंतवून ठेवतात. काही प्रसंगी तर आता पुढे काय? हे जाणून घेण्याची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचते.
एक वाचक म्हणून अनेक प्रकारे हे पुस्तक आपल्याला समाधान मिळवून देतं. अनेक नाट्यमय घडामोडींच्या आधारावर आपण कुठली वेब सिरीज पाहतोय कि काय? असा आभास या कादंबरीतून निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं काहीतरी तुम्हाला यात नक्कीच सापडेल आणि हे वाचून झाल्यावर किमान महिनाभर तरी यातील घडामोडी तुमच्या मनःपटलावर तरंगत राहतील. मधून मधून तुम्हाला खोतांच्या काळात, घरात घेऊन जातील. त्यामुळे तुम्हीही घाई करा आणि हे पुस्तक वाचून तुमचा अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा.
