| पुस्तक | तुंबाडचे खोत | लेखक | श्री. ना. पेंडसे |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मिहाना पब्लिकेशन्स | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | ७३८ | मूल्यांकन | ५ | ५ |
तुंबाड हे नाव कदाचित तुम्ही चित्रपटामुळे आधीच ऐकलं असेल पण पुस्तक प्रेमींना हे नाव त्याआधीपासूनच परिचयाचं असणारं यात काही शंका नाही. तुंबाड हे कोकणातलं एक छोटंसं खेडेगाव श्री. ना. पेंडसे यांनी सर्वप्रथम १९८७ ला उजेडात आणलं ते आपल्या "तुंबाडचे खोत - खंड पहिला" या कादंबरीतून. खोत घराण्याचा व संपूर्ण वंशावळीचा इतिहास मांडणारी कादंबरी वाचकांना थक्क करून टाकेल अशीच आहे. ब्रिटिश राजवट सुरु होण्याच्या पहिल्या दशकात सुरु होणारी हि कादंबरी त्याच राजवटीच्या शेवटच्या दशकात येऊन संपते. असा हा तब्बल सव्वाशे वर्षाचा कालखंड आपल्याला या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.
मोरया हा या कुळाचा मूळपुरुष, त्यानेच तुंबाड वसवलं आणि इथेच तो स्थायिक झाला. परंतु तसं पाहायला गेलं तर बंडू खोत, दादा खोत आणि नाना खोत यांपासून सुरु होणारा हा इतिहास आपल्याला थेट विद्यमान वंशजांपर्यंत घेऊन जातो. तुंबाडचे खोत कादंबरी हि एक नशा आहे, जशी एखादी वेब सिरीज पाहताना आपल्याला आता पुढं काय होणार? याची उत्सुकता लागते अगदी तशीच उत्सुकता हि कादंबरी वाचत असताना लागून राहते. पानोपानी ती उत्कंठा शिगेला पोहोचत राहते आणि मन नकळत पुस्तकात अडकत राहतं. या द्विखंडी कादंबरीचा आवाका हा प्रचंड असून प्रत्यके पात्रागणिक सहानुभूती, माया, द्वेष अशा अनेकांगी भावना वाचकांच्या मनात निर्माण होत राहतात. दादा खोत व बंडू खोत यांच्या अघोरी पूजेची भनक लागताच नाना खोत लिंबाडला स्थायिक होतो. इथेच तुंबाडच्या दोन शाखा निर्माण होतात, तुंबाड आणि लिंबाड! या दोन शाखांच्या प्रवाहातून पुढे अनेक नाट्यमय प्रसंग, सुडाचं, द्वेषाचं राजकारण उभं राहतं मात्र तरीही या दोन शाखांचा एकोपा या ना त्या कारणाने टिकून राहिलेला आपल्याला पहायला मिळतो.
गेम ऑफ थ्रोन्स सारखी वेब सिरीज जशी अनेक विविधांगी पात्रांनी नटलेली असून प्रत्येक पात्राला एक वैयक्तिक छटा आहे; अगदी तशीच छटा आपल्याला श्री. ना. पेंडसेंच्या या कादंबरीतून अनुभवायला मिळते. लिंबाड शाखेचा नरसू खोत आणि तुंबाड शाखेचे जनापा, चिमापा, भिकापा, ताई व बजापा यांच्या अवतीभोवती हा कुलवृत्तांत फिरत राहतो. या पात्रांसोबत भेटीला येणारे बापू वकील, बांडेराम, गंगा, विश्राम, जुलाली, बाबल्याशेठ, देहाडराय, इनामदार इत्यादी पात्रदेखील आपल्याला जाणीवपूर्वक दखल घ्यायला भाग पडतात. कोकणच्या व मुंबईच्या भूभागात घडणारी हि कथा अनेक वळणे घेत जगबुडीच्या किनाऱ्याने सतत जिवंत असल्याची जाणीव करून देते. गणेशशास्त्रींच्या रूपाने लाभलेला महापुरुष हा या कुळाचा खरा उद्धारकर्ता आपल्याला भारावून टाकतो. तरीही या सगळ्या कथानकात बाजी मारतो तो बजापा. त्याचं आयुष्यच मुळात अनेक साहसी प्रसंगांनी वेढलेल आहे. अशी ही अनेक पात्र आपल्या मनाचा वेध घेत संपूर्ण कादंबरीभर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात. या ना त्या कारणाने ती सतत वाचकांना खिळवून ठेवतात.
मराठीमधली एक उत्तम कलाकृती जर तुम्ही वाचण्यासाठी शोधत असाल तर या कादंबरीपाशी येऊन तुमचा शोध नक्कीच संपेल याची खात्री बाळगा. भाषेची यथायोग्य मांडणी आपल्याला या कादंबरीतून पाहायला मिळते. कोकण आणि तत्कालीन सामाजिक मानसिकता सबंध कादंबरीभर आपल्याला अनुभवायला मिळते. अशी ही कादंबरी प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात नक्की वाचली पाहिजे. त्यामुळे तुम्हीही या साहित्यकृतीचा आस्वाद घ्या आणि तुमची मतं आम्हाला जरूर कळवा.
