ल्युकेमियावर विजय - अमित कोहली | Leukemiavar Vijay - Amit Kohli | Marathi Book Review

ल्युकेमियावर-विजय-अमित-कोहली-Leukemiavar-Vijay-Amit-Kohli-Marathi-Book-Review
पुस्तक ल्युकेमियावर विजय लेखक अमित कोहली
प्रकाशन अस्तित्व प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १६५ मूल्यांकन ४.५ | ५

कधी कधी काही आजार हे तुमच्या नकळत बळावत असतात. त्याची अस्पष्ट चाहूल आपल्याला शरीर या ना त्या मार्गाने देतही असतं; मात्र तो इतका भयावह असेल अशी कल्पना प्रथमदर्शनी कुठलाच मनुष्य करत नाही. मात्र या अशा दुर्धर आणि भयावह आजारावर मात करण्याचं बळ ज्याच्या अंगात असतं तोच मनुष्य या जीवन मरणाच्या लढाईत विजयी होतो. नुकतचं अशा एका आजारावर विजय मिळवलेल्या थोर व्यक्तिमत्त्वाची संघर्षगाथा माझ्या वाचनात आली आणि मन विविध भावनांनी भरून आलं. डॉ. प्रकाश आमटे हे नाव माहीत नसलेला माणूस तसा दुर्मिळच; मात्र त्यांच्या आयुष्याबद्दल व कार्याबद्दल जाण असणारे देखील दुर्मिळच. आता बऱ्याचशा लेखकांनी त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल लेखन केलेलं आहे. मात्र हे सगळं करत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर म्हणावं तितकंस लिखाण झालेलं नाही. हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्पामार्फत गोंड आणि माडीया आदिवासींच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा अवलिया आपल्याला “ल्युकेमियावर विजय” या पुस्तकातून अजून जवळून वाचायला मिळतो.

लोक बिरादरी प्रकल्पात काम करत असताना, सेवा करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असे, मात्र प्रकाश आमटेंच्या संयमी, विजिगिषु वृत्तीने नेहमीच त्यातून यशस्वी मार्ग काढला. “ल्युकेमियावर विजय” या पुस्तकातून अमित कोहली यांनी डॉ प्रकाश आमटेंचा आरोग्यप्रवास वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे. दोन हजार बावीस साली झालेला हा रक्ताचा कर्करोग आणि त्याच्याशी प्रकाश आमटेंनी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिलेली झुंज ही अत्यंत भावनिक आणि कस पाहणारी आहे. बालपणापासूनच धाडसी असणारे प्रकाश आमटे ह्या आजाराला देखील धीरोदात्तपणे सामोरे गेले, त्याचीच ही यशोगाथा. परंतु हा प्रवास फक्त कर्करोगाचा नसून प्रकाश आमटेंच्या आयुष्यातले अनेक प्रसंग अधोरेखित करणारा आहे. त्यांचं प्राणी प्रेम, त्यातून उभं राहिलेलं "आमटेज अ‍ॅनिमल आर्क" सारखं संवर्धनाचं काम, आदिवासींच्या आयुष्याला कलाटणी देणारे विविध प्रसंग, तसेच बालपणीचे किस्से अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतात.

सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न डॉ प्रकाश आमटेंनी केले आहेत. मग त्यात सापाबद्दल माहिती देणं असो किंवा भेट देणाऱ्या व्यक्तींना प्रात्यक्षिक दाखवणं असो; यात ते नेहमीच तत्पर राहिले आहेत. हे करत असतानाच एक जीवघेणा प्रसंग त्यांच्यावर बेतला होता. एका रसेल्स वायपर या अत्यंत विषारी सापाने त्यांच्या बोटाला चावा घेतला तरीही तो साप भिरकावून न देता त्याला अलगद त्याच्या जागी सोडल्यावरच प्रकाश आमटे उपचार घ्यायला धावले. या प्रसंगात त्यांना अतोनात यातना सहन कराव्या लागल्या; तरीही यात सापाचा दोष नसून आपलीच चूक झाल्याची प्राजंळ कबुली हा माणूस देतो. "प्रेमाचे चावे" या प्रकरणात हा थरारक प्रसंग वाचताना प्रकाश आमटेंच्या मानसिक स्थैर्याची जाणीव वाचकांना प्रकर्षाने झाल्याशिवाय राहणार नाही. एकूण अकरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. डॉ. प्रकाश आमटेंचा हा प्रवास अनेकांना धीर देणारा आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायच झाल्यास, "औषधं आपलं काम करतात; पण मनाचा निर्धार शरीराला साथ देतो." इतक्या सोप्या शब्दांत ते आपल्याला सांगून टाकतात. कुठल्याही रुग्णाला या पुस्तकातून प्रेरणा मिळेलच, परंतु आयुष्याच्या लढाईत मार्ग हरवलेल्या प्रत्येकाला पुन्हा भरारी घेण्याची प्रेरणाही या पुस्तकातून मिळेल, असं मला वाटतं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझा गोष्टींकडे, समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, हे मी नक्कीच मान्य करेन.

बाकी पुस्तकाची संरचना, मुखपृष्ठ, बांधणी या सगळ्याच गोष्टी उत्तम झाल्या आहेत. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची व डॉक्टरांची मोलाची भूमिका देखील यात अधोरेखित झाली आहे. लेखकाची मातृभाषा मराठी नसूनही स्वतःच्याच इंग्रजी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद त्यांनी उत्तमरीत्या केला आहे. एकाच बैठकीत वाचून होईल अशा छोटेखानी परंतु प्रभावी पुस्तकाच्या शोधात जर तुम्ही असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे; असं समजायला हरकत नाही. अमित कोहली यांनी सर्वतोपरी काळजी घेत अगदी सोप्या भाषेत सगळ्या संज्ञा स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे ज्यांना वैद्यकीय शाखेबद्दल काही माहित नाही अशाही वाचकांना हे पुस्तक सहज आपलंस वाटेल यात शंका नाही. म्हणून आजच हे पुस्तक विकत घ्या आणि एका उच्चकोटीच्या अनुभवाला सामोरे जा, मात्र ते करत असाताना आपला अभिप्राय आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form