| पुस्तक | सीता | लेखक | देवदत्त पट्टनायक । विदुला टोकेकर |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मंजुळ पब्लिशिंग हाउस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | ३४४ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
रामायण म्हणजे राम, लक्ष्मण, सीता यांनी उपभोगलेला वनवास; राम आणि रावणाचं युद्ध; हनुमानाची भक्ती, भरताचे बंधुप्रेम; कैकयीचा लोभ इत्यादी गोष्टी ठळकपणे आपल्या समोर उभ्या राहतात. पण रामायण यापुरतंच सीमित आहे का? रामायणाकडे आपण अजून कुठल्या दृष्टीकोनातून पाहू शकतो का? रामायणात घडणाऱ्या घटनांना आणखी काही पार्श्वभूमी लाभलेली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर देवदत्त पटनाईक लिखित व विदुला टोकेकर यांनी अनुवादित केलेल्या "सीता - रामायणाचे चित्रमय पुनर्कथन" या पुस्तकात तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील. आपल्याला माहित नसलेल्या अनेक कथा, उपकथा या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळतात. एकनाथ रामायण, कंब रामायण, वाल्मिकी रामायण अशा अनेक भारतीय रामायणांच्या विविध ग्रंथांच्या आधारे या सर्व कथा लेखकाने आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
हे पुस्तक वाचताना या महाकाव्याकडे बघण्याचा एक अनोखा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. हि कथा बऱ्याचदा आपण फक्त रामाला नायकाच्या आणि सीतेला नायिकेच्या भूमिकेत ठेवून पाहत/वाचत असतो. पण मुळात रामायणाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रसंगात एक वेगळा नायक नायिका लाभली आहे; हे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईल. लेखकाने मांडलेल्या विचारांनी आपणही प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. अनेक कथांना वेगवेगळ्या प्रादेशिक रामायणात कशाप्रकारे रंगवण्यात आलं आहे याचंही विश्लेषण लेखक या ठिकाणी करतो. रामायण सर्वश्रुत आहेच; आपण ते लहानपणापासून वाचत/ऐकत आलो आहोत. परंतु हे पुस्तक वाचताना आपण नवीन काहीतरी वाचत आहोत हि भावना सबंध पुस्तकभर टिकून राहते.
अनुवाद करताना मूळ कथेला कुठलीही हानी पोहोचू नये याची पुरेपूर काळजी अनुवादकीने घेतलेली आहे. हे मूळ पुस्तक इंग्रजी मध्ये उपलब्ध असून त्याचा अनुवाद मराठीमध्ये केला गेला आहे. एकंदर हे पुस्तक वाचत असताना तुम्हीही अडकून राहता. राम सीतेबरोबर प्रवास करत राहता. माहित असूनही वाचायला भाग पाडणारं पुस्तक वाचकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हीही प्रत्यक्षात याचा अनुभव घ्या आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा.
