| पुस्तक | हृदयस्पर्श | लेखक | कृणाल किशोरराव अमृतकर |
|---|---|---|---|
| प्रकाशन | बुकलीफ पब्लिशिंग | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | ४६ | मूल्यांकन | ३.९ | ५ |
नुकताच “हृदयस्पर्श” नावाचा एका नवोदित कवीचा कविता संग्रह वाचून पूर्ण झाला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधून लिहिलेल्या कविता या काव्यसंग्रहात आपल्याला वाचायला मिळतात. आयुष्य जगत असताना आलेल्या अनेक अनुभवांची शिदोरी यातून कवीने वाचकांसाठी खुली केली आहे.
हृदयात साचेलेलं सगळं काही कागदावर उतरवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे कवीने केला आहे. आजच्या जीवनात घडणाऱ्या काही बऱ्या वाईट विषयांना कवितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं कामदेखील या पुस्तकाच्या निमित्ताने साधलं गेलं आहे.
प्रेम, आपुलकी, लोभ, माया अशा अनेक मानवी प्रवृत्तींवर रचल्या गेलेल्या कविता तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतील. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच तुमच्या हृदयाला स्पर्शून जातील. कृणाल अमृतकर हे मुळचे चंद्रपुरचे रहिवासी असून पेशाने इंजिनिअर आहेत. हे पुस्तक वाचताना तुम्हाला स्थानिक मराठी भाषेचा प्रभाव जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सरळ साध्या भाषेचा वापर करून त्यांनी ह्या काव्य रचना केल्या आहेत.
“आई”, “सुख म्हणजे काय”, “आज की दुनिया” अशा कविता तुमच्या जाणिवा चेतवल्याशिवाय राहत नाहीत. “हरवलेला रंग” ही कविता तुम्हाला एक नवी उभारी देऊ पाहते. तसेच “दिल का पेड” ही हिंदी कविता तुम्हाला तुमच्या प्रियजनाची आठवण करून देईल. तसेच मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा एकमेकांत गुंफून एक नवा काव्यप्रकार कवीने सादर केला आहे; जो वाचून तुम्हालाही मजा येईल.
आपल्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहात काही महत्वाचे विषय हाताळून कवीने एक चांगली सुरवात केली आहे. काही ठिकाणी दुरुस्ती होऊ शकते पण हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे वाचक सांभाळून घेतील अशी आशा करतो. एकंदर एकदा वाचून अनुभव घेण्यासाठी, जीवनाचा एक वेगळा प्रवाह समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही हातात घेऊ शकता. त्यामुळे आजच आपली प्रत ऍमेझॉन वरून नक्की विकत घ्या आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.
