| पुस्तक | पंखा | लेखक | प्रकाश नारायण संत |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मौज प्रकाशन गृह | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | १९२ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
प्रकाश नारायण संत यांचा "पंखा" हा तिसरा कथासंग्रह. "वनवास" आणि "शारदा संगीत" या दोन भागातून आपण लंपनच्या भावविश्वाचा धांडोळा घेतला असेल; तर तुमच्या लक्षात येईल कि लंपनच विश्व हे प्रत्येक गोष्टीबद्दलच्या कुतूहलातून, व्यापक दृष्टीतुन व संवेदनशील मनाच्या शोधक वृत्तीतून तयार झाले आहे. लंपनच हे कधीही न संपणार विश्व आपल्याही मनात नकळत रुंजी घालू लागतं. आणि कधी आपण त्याचाच एक भाग होऊन जातो ते समजतही नाही. प्रत्येक कथेतून एक वेगळा दृष्टिकोन समस्त वाचकांसमोर उभं करण्याचं सामर्थ्य प्रकाश नारायण संत यांच्या लंपनमध्ये दडलेलं आहे. "वनवास" पासून सुरु होणारा हा ओळखीचा प्रवास "पंखा" मधून अधिकाधिक दृढ होत जातो.
एकूण अकरा कथांचा हा संग्रह तुम्हाला खिळवून ठेवतो आणि लंपनच्या जगात प्रेमाने डुंबायला भाग पाडतो. सुमी आणि लंपनच्या मैत्रीबद्दल आपल्याला पान आणि शोध या दोन कथांमधून सविस्तर वाचायला मिळतं. त्यातल्या त्यात शोध मध्ये त्यांच्या मनाचा थांग वाचकांना लागायला सुरवात होते. सफाई मध्ये बाबुरावची फजिती वाचताना आपल्यालाही मजा येते. डग, पॅच आणि पाहुण्या सारख्या कथा नकळत आपल्या मनाला हात घालत, हळवं करून सोडतात. नाणं, पुल आणि झांज या कथांमधून तुम्ही अनेक नवे पैलू अनुभवू शकता.
मात्र मनात कायम घर करून राहतील अशा दोन कथा या कथासंग्रहात तुम्हांला नक्की वाचायला मिळतील असं मला वाटतं. पहिली पंखा ही शीर्षक लाभलेली कथा आणि दुसरी ग्रंथ हि शेवटची कथा मनाला चुटपुट लावून जाते. पंखा मधला सावकार आणि ग्रंथ मधला मन्याशेट या दोन व्यक्ती तुम्हाला ठळकपणे आठवत राहतील यात शंका नाही. बाकी बाबुराव, आज्जी, आजोबा, सुमी, लंपनचे मित्र या व्यक्तिरेखा सबंध पुस्तकभर तुमच्या अवतीभोवती फिरत राहतात.
"टांगा भुक्कड असला तरी टांगेवाला फक्कड असला पाहिजे", असं आजोबा लंपनला का सांगतात हे डग या कथेमधून आपल्याला समजून येईल.
लंपनच्या कथा कधीच संपू नये असं वाटतं असतानाच हे पुस्तक वाचून पूर्ण होतं. प्रत्येक कथेला पूरक शेवट लाभला असल्याने पूर्ततेचा आनंद वाचकांना मिळाल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही कथेपासून तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरवात करू शकता कारण आधीच्या दोन भागातून त्यातल्या महत्वाच्या पात्रांशी तुमची ओळख झालेली असते. आणि जरी झालेली नसेल तरी त्याने काही फरक पडतो असं मला वाटत नाही. प्रकाश संतांच्या लेखणीतून साकारलेला हा कथासंग्रह कुठल्याही वाचकाला अफाट आनंद दिल्याशिवाय राहत नाही. त्यातल्या त्यात सुजाण आणि चोखंदळ वाचकांसाठी तर हे पुस्तक म्हणजे मोठी पर्वणीच म्हणावं लागेल. बाकी तुम्हाला हा कथासंग्रह कसा वाटतो हे वाचून आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.
