आणखी किती जपायचं - श्रद्धा वासनिक | Aankhi Kiti Japayache - Shraddha Wasnik | Marathi Book Review

आणखी-किती-जपायचं-श्रद्धा-वासनिक-Aankhi-Kiti-Japayache-Shraddha-Wasnik-Marathi-Book-Review
पुस्तक आणखी किती जपायचं लेखक श्रद्धा वासनिक
प्रकाशन नचिकेत प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ५० मूल्यांकन ३.५ | ५

मानवी नातेसंबंध आणि गुंतागुंत या दोन्ही गोष्टी नेहमीच हातात हात घालून चालत आलेल्या आहेत. अनेकदा गैरसमज किंवा गृहीत धरण्याच्या कृतीमुळे नात्यात तणाव निर्माण झालेला आपण पाहिला वा अनुभवाला असेलच. अशा तणावाखाली माणसाचं मन सैरभैर होणं हे अगदी स्वाभाविक आहे. अशा सैरभैर झालेल्या मनाला बांध घालणं आजच्या जगात अत्यंत गरजेचं बनलेलं आहे कारण आपल्या विचारक्षमतेच्या कितीतरी पटीने आपल्या अवतीभवतीचं जग बदलत आहे. अनेकदा नाती जपताना आपल्या मनाचा तोल ढासळतो, हा ढासळलेला तोल त्वरित सावरला नाही तर आपणही त्यात अडकून पडण्याची शक्यता निर्माण होते. असाच काहीसा विषय घेऊन लेखिका प्रो. श्रद्धा वासनिक यांनी "आणखी किती जपायचं" हे पुस्तक लिहिलं आहे.

मनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांना त्यांनी या पुस्तकातून मोकळीक करून दिली आहे. कुठेही व्यक्त न होणारे, आतल्या आत मन जाळणारे कितीतरी विचार त्यांनी यात मांडले आहेत. हे पुस्तक वाचत असताना कदाचित तुम्हाला वाटेल कि, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच तेच वाचताय कि काय? पण नीट लक्ष दिल्यास लक्षात येईल कि, लेखिकेने आपल्या मनातले विचार कुठलेही बंधन न घालता जसे आलेत तसे मांडले आहेत. आणि मानवी मनात सारखा सारखा उठणारा विचारांचा कल्लोळ या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केला आहे.

नात्यामधली जवळीक असो, दुरावा असो, कोणासाठी सतत झटणं असो वा आत्मसमर्पण करणं असो; हे सगळं करत असताना होणारा अपेक्षाभंग हा अनेकांना हादरवून सोडतो. अशा हादरलेल्या मनांना गरज असते ती संवादाची, त्यातून बाहेर पडत आपली वाट शोधण्याची. मला वाटतं हे पुस्तक तुम्हाला तो संवाद तुमच्याच भाषेत उपलब्ध करून देतं. आजच्या तरुणाई पुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी नात्यात येणारा दुरावा आणि त्यातून होणार हृदयभंग हि एक जटिल समस्या झाली आहे. त्यातून बाहेर पडून समृद्ध आयुष्य जगणं हे हि तितकंच महत्वाचं आहे. नाते जपताना स्वाभिमान गहाण ठेवून जगण्यात काहीच अर्थ नाही हे आपल्याला समजायला हवं.

एकाच बैठकीत वाचून होणारं हे छोटेखानी पुस्तक तुम्हीही वाचून पहा. कोणीतरी तुमच्याच मनातलं तुम्हाला समोर बसवून सांगत आहे, असा काहीसा अनुभव त्यातून तुम्हाला मिळेल. रोजच्या जीवनात महत्वाचा असणारा हा विषय हाताळण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्यामुळे तुम्हीही एकदा हे अनुभवून पहा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form