नूर-ए-ग़ज़ल - उदय सुभेदार | Noor-E-Gazal - Uday Subhedar | Marathi Book Review

नूर-ए-ग़ज़ल-उदय-सुभेदार-Noor-E-Gazal-Uday-Subhedar-Marathi-Book-Review
पुस्तक नूर-ए-ग़ज़ल लेखक उदय सुभेदार
प्रकाशन शब्दस्नेह प्रकाशन समीक्षण आर्या पळसुले
पृष्ठसंख्या १६५ मूल्यांकन ४.६ | ५

गझल म्हटलं की पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे भावना. उत्कट प्रेम, विरह, एकांत, विरोधाभास, आकांक्षा, स्वाभिमान अशा अनेक भावनांची निखळ अभिव्यक्ती म्हणजे गझल. अशी गझल जर स्वरबद्ध होऊन गायलेली असेल तर अर्थ कळो न कळो, सुरांचे आकलन होवो न होवो प्रत्येक वेळी ऐकताना नव्याने भावते.

लेखक श्री उदय सुभेदार यांनी अतिशय ओघवत्या शैलीत अशा ५१ गझलांचं सौंदर्य त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "नूर-ए-ग़ज़ल" या पुस्तकात विस्ताराने उलगडून दाखवलं आहे. कतील शिफाई, फैज अहमद फैज, नासिर काजमी, अहमद फराज सारख्या उर्दू शायरांच्या लेखणीतून उतरलेल्या गझलांचे प्रसिद्ध गायकांनुसार वर्गीकरण केले आहे. प्रत्येक गझलेचे मराठी भाषांतर आणि सांगीतीक विश्लेषण लेखकाने इतक्या सोप्या शब्दांत केले आहे की असं वाटावं लेखक आणि वाचक समोरासमोर बसून गप्पागोष्टी करत आहेत. 

संग्राह्य ५१ गझलांसोबतच लेखकाने सुरेश भटांच्या लेखावर केलेले वक्तव्यही वाचनीयच. गुलाम अली, आशा भोसले, तलत यांच्या सुरावटींचे ढंग बारकाईने समजावून देताना, 'आज माझ्यासाठी ही गझल पुन्हा ऐका' असा आग्रह लेखकाने करण्याआधीच कुतूहल इतके शीगेला पोचते की वाचतानाच गझल ऐकणं सुरू झालेलं असतं. गझलेचा अर्थ, शब्दार्थ, संगीतातले राग, भावनांची चढ-उतार आणि विशेष म्हणजे त्या गझलेशी निगडीत लेखकाचे भावविश्व हे इतकं सहज तरल आहे की पुन्हा गझल ऐकता वाचताना / अनुभवताना वाचकांना त्या विश्लेषणाचा भार होणार नाही.

यातून लेखकाचे गझल आणि संगीतावरचे अभ्यासपूर्ण प्रेम जाणवते.

लेखक स्वतः इंजिनीयरिंग/व्यवस्थापन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत आहेत, तसेच त्यांची शास्त्रीय संगीत, गीतगायन, गझल, हिंदी गाणी याची आवड व कामही  उल्लेखनीय आहे. या पुस्तकाची प्रस्तावना प्रदीर्घ काळ व्यावसायिक संगीतकार असणारे आणि गझलचे अभ्यासक डॉ. आशिष मुजुमदार यांनी लिहिली आहे. 

उर्दू, मराठी, हिंदी या भाषांवर, संगीतावर किंवा दोन्हींवर प्रेम असलेल्या वाचकांना Audio Storytelling च्या जमान्यात हे पुस्तक श्रवण आणि वाचन असे दोन्ही आनंद एकत्रितपणे देते यात शंका नाही.

-© आर्या पळसुले.

Previous Post Next Post

Contact Form