मृण्मयी - गो. नी. दाण्डेकर | Mrunmayee - Go. Ni. Dandekar | Marathi Book Review

मृण्मयी-गो-नी-दांडेकर-Mrunmayee-Go-Ni-Dandekar-Marathi-Book-Review
पुस्तक मृण्मयी लेखक गो. नी. दाण्डेकर
प्रकाशन मृण्मयी प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २५७ मूल्यांकन ४.८ | ५

मोगरा फुलाला, तुका आकाशाएवढा, दास डोंगरी राहतो अशा या संतचरित्रानंतर गोनीदांचं मृण्मयी हाती आलं आणि मी पुन्हा एकदा थक्क झालो. ह्या माणसाबद्दल आणि त्यांच्या लेखनाबद्दल आपण जितकं वाचत जाऊ तितकं आपल्याला  भारवल्यासारखं वाटतं. द्वैत, अद्वैत याबद्दल हा माणूस इतकं भरभरून लिहितो कि कोणताही वाचक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. गोनीदांची ग्रंथसंपदा हि आजच्या आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अतिशय मौल्यवान गोष्ट असणार आहे; असं मला वाटतं. त्यांचं एक ना एक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून पारायण करावं इतकं अद्भुत आहे. एकंदर सगळं वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईल कि हा माणूस कोणी सामान्य व्यक्ती नसून तो नक्कीच एक अवलिया असला पाहिजे. मराठी साहित्यक्षेत्रात हा माणूस जन्माला आला म्हणून आपण खरंतर फार भाग्यवान आहोत. हे सगळं इथं सांगण्याचं कारण म्हणजे मृण्मयी वाचून झाल्यावर हि एक प्रकारे येणारी प्रचितीच आहे. फक्त मृण्मयीच नव्हे तर त्यांच्या कुठल्याही साहित्यकृतीने वाचक भारावून जातील असा मला विश्वास आहे.

गणपत भिकाजी खरे उर्फ तात्या नावाच्या कोकणात जन्माला आलेल्या माणसाची व त्याच्या पोटी जन्मलेल्या मनोरमा या दोघांच्या जीवनप्रवाहाची कथा म्हणजे मृण्मयी! कोकणाशी घट्ट नाळ जोडलेल्या गणपत उर्फ तात्यांना पोटासाठी कोकण सोडून देशावर जावं लागतं. इजारदारांच्या पदरी राहून मास्तरकी करत आपला प्रपंच करावा लागतो. हलाखीच्या परिस्थितीमध्ये ज्ञानोबांचा, तुकारामांचा ज्ञानाधार घेत तात्या मनूचं संगोपन करतात. इवल्या मनूला तात्या जे जे श्लोक म्हणून दाखवत ते ते ती चोख म्हणत असे. लवकरच तात्यांच्या लक्षात आलं कि हि मुलगी एकपाठी आहे, जे जे आपण सांगू ते ते टिपत आहे. पुढे गाडगे बाबांच्या उपदेशानुसार मनू देवाला समर्पित होऊन, मनोभावाने देवाची होऊन जाते. पुढे तात्यांचा उष्माघाताने मृत्यू होतो; मनू आणि आईवर काळ सोकावू लागतो. ह्या सगळ्यातून ते कसा मार्ग काढतात ते पुस्तकात वाचलेलंच उत्तम.

तात्यांच्या तोंडून कोकणाबद्दल ऐकत ऐकत मोठी झालेली मनू कोकणातलं स्थळ येताच लग्न करायला तयार होते. फक्त कोकणात जगता येईल या एका आशेवर मनू एका विपरीत माणसाच्या गळ्यात माळ घालते. इथूनच तिचा स्वःचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होतो. कोकणातल्या आपल्या बागेत खपणारी मनू संपूर्णतः निसर्गसेवेत रमून जाते. नवरा, सासू यांच्या जाचाचा भार ती निसर्गप्रेमातुन हलका करते. पुढे नवऱ्याचा अकस्मात मृत्यू होताच एकट्या बाईचं भयाण आयुष्य तिच्या वाट्याला येतं, नाही नाही ते आरोप तिच्यावर होतात. पण जी खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी जगली, सर्वस्वाने देवाचीच झाली त्या मनूवर ह्या सगळ्याचा परिणाम थोडीच होणार? मीरा जशी आपल्या भक्तीत तल्लीन होऊन जगली अगदी त्याचप्रमाणे मनूही हरीची होऊन जगली. म्हणूनच ती अद्वैताला पोहोचू शकली. मनूच्या म्हणण्याप्रमाणे -

"ज्ञानेश्वरी जगनारं कुणी भेटलं नाहीं आजपर्यंत. तो ग्रंथ कठीण आहे! तो जगले स्वतः ज्ञानेश्वरमहाराज! मी अत्यंत क्षुद्र आहे... पण राजहंस गगनी झेप घेतो, म्हणून मुरकुटानं का उडणं टाकायचं?"

मृण्मयी हा मनाचा मनाशी चालणारा अध्यात्मिक संवाद असून तो समस्त वाचकांना तृप्त करून सोडतो. मृण्मयी हि फक्त मनुची वा तात्यांची कहाणी नसून समजून घेण्याचा विषय आहे. गोनीदांची कथा मांडण्याची शैली, रसभरीत वर्णन, कोकणच्या कविता, ज्ञानेश्वरांचे अभंग यांनी मृण्मयी काळजाचा ठाव घेऊन जाते. कुठल्याही रसिक वाचकाला फार काळ ह्या लेखन अविष्कारापासून दूर राहता येईल; असं मला वाटत नाही. मीरा आणि मनू या दोन्ही एकाच रसात आकंठ बुडाल्या आणि आयुष्याचा प्रवाह तरुन गेल्या, हे मृण्मयी वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. तुम्हालाही जर या सुखद प्रवासात सहभागी व्हायचं असेल तर तुम्हीही हा अमृतानुभव घेतला पाहिजे. त्यामुळे आजच मृण्मयी हाती घ्या आणि वाचून झाल्यावर तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form