| पुस्तक | वाघाच्या मागावर | लेखक | व्यंकटेश माडगूळकर |
|---|---|---|---|
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
| पृष्ठसंख्या | १८४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
आपल्यातल्या अनेकांना जंगलाचं कुतूहल असतं. विकास होण्याआधी सगळीकडे जंगलांची भरभराट होती हे आपण जाणतोच, मात्र मानवी हस्तक्षेपामुळे आणि लोभामुळे आज कित्येक जंगले नामशेष झाली आहेत. जंगलांबरोबर अनेक वन्यप्राणीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पुण्यासारख्या शहराला तर अगदी शिवकाळापासून जंगलाचा वारसा आहे. मात्र झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाचा तोटा आज निसर्ग आणि मानव मोठ्या प्रमाणावर मोजत आहे. त्याचाच परिणाम म्हणून कि काय भेकर (barking deer) सारखा पूर्वी सहजगत्या दिसणारा प्राणी आज पुणे परिसरातून गडप झाला आहे. मुळशी, खडकवासला, सिंहगड सारखा परिसर आता मोटारी आणि इमारतींच्या विळख्यात सापडल्यामुळे वन्यजीवन झपाट्याने नामशेष झाले आहे. परंतु पन्नास वर्षांपूर्वी खरंतर परिस्थिती इतकी बिकट नव्हती हे, व्यंकटेश माडगूळकरांच्या "वाघाच्या मागावर" हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल.
शिकारीचा नाद असणाऱ्या लेखकाच्या अनुभवातून जंगल बघण्याची, समजून घेण्याची एक अनोखी संधी या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना प्राप्त झाली आहे. वाघाच्या मागावर या कथेने पुस्तकाची सुरवात होते, आणि गंगाराम, गोविंदा कातकरी, जंगल, व्याघ्री सारख्या कथांनी आपण त्यात हरवून जातो. प्रत्येक ओळीगणिक आपल्याला जंगलाचा आभास होत राहतो. शिकार, लढत यांसारख्या कथांमधून जंगलात घडणाऱ्या घडामोडी आणि त्यांचे अर्थ आपल्या लक्षात येऊ लागतात. व्याघ्री सारखी कथा आपल्याला संभ्रमात ठेवत आपल्या अंगावर रोमांच उभं करते. पूर्वी गावोगावी पोटासाठी फिरणाऱ्या पारध्यांबद्दलची देखील कथा आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते. आपल्या शिकारी वृत्तीबद्दल लिहताना लेखक म्हणतात,
"पण अशा प्रसंगांमुळे (हा प्रसंग समजून घेण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे) मी बंदूक टाकून दुर्बीण हाती घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले, तर कोणता चांगला माणूस जिवंत राहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील?"
प्रत्येक कथेतुन वाचकांचं कुतूहल जागृत ठेवण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. पुस्तकाच्या प्रत्येक टप्प्यात आपण जंगलात आत आत जात राहतो आणि वन्य जीवनाबद्दल, शिकारीबद्दल नवनवीन बाबी समजून घेऊ लागतो. सहज सोपी भाषा, सफाईदार प्रसंगांचं वर्णन, उत्कंठा वाढवण्याची हाथोटी अशा एक ना अनेक गुणांमुळे "वाघाच्या मागावर" हे पुस्तक वाचकांच्या मनावर छाप सोडून गेलं नाही, तर नवलच म्हणावं लागेल. एक दोन दिवसात सहज वाचून होणारं हे पुस्तक आपण नक्की वाचून पहा आणि तुमच्या या साहसी जंगल/शिकारी सफरीबद्दल आम्हाला आवर्जून कळवा.
