पुस्तक | ...आणि रामा कलेक्टर झाला | लेखक | अशोक किसन पवार |
---|---|---|---|
प्रकाशन | पारनेर साहित्य साधना प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३०८ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
संघर्षाकडून समृद्धीकडे जाणारा मार्ग सगळ्यांनाच इच्छित स्थळी घेऊन जातो असे नाही. कधी कधी तो संघर्षाकडेच जात राहतो मात्र माणूस जर जिद्दीने झपाटलेला असेल तर समृद्धीपासून त्याला कोणी अडवू शकत नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याची पुरेपूर कल्पना असेल. यूपीएससी, एमपीएससी सारख्या ध्येयाच्या माघे धावताना अनेकदा मानसिकतेचा खरा कस लागलेला त्यांनी अनुभवलं असेल. असाच एक कसोटीचा काळ कोरोनाच्या रुपाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातही येऊन गेला. कित्येकांनी आपल्या आप्तस्वकीयांना त्यात गमावलही असेल. अशा या संकटावर अपार मनोबलाच्या जोरावर मात करत लेखक अशोक किसन पवार यांनी “…आणि रामा कलेक्टर झाला” ही कादंबरी साकारत समस्त वाचकांसाठी एक प्रेरणास्रोत उपलब्ध करून दिला आहे. स्पर्धा परीक्षा जशी जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर जिंकता येते अगदी तशीच आयुष्याची लढाई हा माणूस लढला आणि जिंकला आहे.
कादंबरीचा नायक रामा हा अगदीच प्रतिकुल परिस्थितीतून आलेला आहे. घर चालवण्यासाठी, बापाचा आधार होण्यासाठी कामाच्या शोधात तो मुंबईला येतो. रंगा ह्या आपल्या जिवलग मित्रासोबत हमालीचं काम सुरू करतो. हे काम करत असताना त्याला जाणीव होते की आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर आणखी शिकलं पाहिजे. अशातच जुबिनभाईच्या गोडावूनला माल टाकत असताना रामाच्या हुशारीने प्रभावित होऊन जुबिनभाई दोघांना नवी नोकरी देऊ करतो. तिथे काम करत असताना रंगाच्या कणखर पाठबळावर रामा रात्रशाळेत दाखल होतो. आणि इथूनच त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळते.
पुस्तकाच्या नावावरून आपल्या लक्षात आलंच असेल कि ही कहाणी रामाच्या कलेक्टर होण्याच्या प्रवासावर आधारलेली आहे. मात्र तो प्रवास नक्की कसा आणि किती हलाखीचा होता हे तुम्हाला पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. आजही आपल्या देशातले कित्येक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यातले कित्येक जण अपयशी होताना आपण पाहिलेही असतील; त्या सगळ्यांना रामाच्या कहाणीने पुन्हा एकदा लढण्याचे बळ नक्की मिळेल असं मला वाटतं. रामाच्या प्रवासात त्याला मदत करणारे रंगा, बाई, आबा, जुबिनभाई, नविनभाई, अभिजीत सर आणि त्याची प्रेयसी रूसी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आयुष्यात जिद्दीने प्रयत्न करणाऱ्याच्या मागे असे अनेक मदतीचे हात आपोआप उभे राहतात हे या पुस्तकातून आपल्याला समजून येतं. रामाचा हा प्रवास कधी आपल्या दिनक्रमाचा भाग होऊन जातो हे आपल्याला कळतही नाही. पुस्तक वाचून झालं तरी रामा, रंगा आणि रूसी ही पात्र वाचकाच्या मनावर राज्य करत राहतात. पुस्तक वाचत असताना सुरवातीला घटनाक्रम लवकर घडत असल्याची भावना तुमच्या मनात येऊ शकते मात्र जसजसं तुम्ही वाचत जाल तसतसं कथानक तुम्हाला गुंतवत जातं.
खेडेगावातून आलेला रामा हा नायक आपल्याला खूप जवळचा वाटतो याचं सगळं श्रेय हे लेखकाच्या पात्र उभं करण्याच्या प्रतिभेच आहे; असं मला वाटतं. मुंबई, रामाच गाव यांचं चपखल वर्णन आपल्याला पुस्तकात वाचायला मिळते. युपीएससीची तयारी करताना लक्षात घेण्यायोग्य अनेक बाबी लेखकाने विस्तृतपणे मांडल्या आहेत; त्याचा त्या क्षेत्रातील युवकांना नक्की फायदा होईल. एरवीही आयुष्यात खचलेल्यांना उभारी देण्याचं काम हे पुस्तक करु शकतं, त्यामुळे वाचकांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. संग्रही असावं असं अजून एक पुस्तक आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.