द बुक ऑफ राम - देवदत्त पट्टनायक | The Book of Ram - Devdutt Pattanaik | Marathi Book Review

द-बुक-ऑफ-राम-देवदत्त-पट्टनायक-The-Book-of-Ram-Devdutt-Pattanaik-Marathi-Book-Review
पुस्तक द बुक ऑफ राम लेखक देवदत्त पट्टनायक । चेतन कोळी
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाउस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २२४ मूल्यांकन ४.८ | ५

रामायण, महाभारत या पुस्तकांकडे आपण पौराणिक ग्रंथ म्हणून पाहत आलो आहोत. भारताच्या प्रत्येक घरात रामायणाचं पारायण एकदातरी झालं असेलच. कित्येक धर्मगुरूंनी, आचार्यांनी रामकथांवर अनेक प्रवचने, कीर्तने सादर केली आहेत. भारतीय संस्कृतीचे दार्शनिक प्रतिनिधित्व या दोन महाकाव्यांनी आजवर केलेलं आहे. हिंदू लोकांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा मानबिंदू म्हणून प्रभू श्रीरामाकडे पाहिलं जातं, घराघरातून तो भगवान म्हणून पूजला जातो. आजवर लिहिल्या गेलेल्या, रचल्या गेलेल्या रामायणाच्या अनेक आवृत्त्या आणि प्रति उपलब्ध आहेत. काळानुसार, प्रांतानुसार, भाषेनुसार त्यात अनेक प्रसंगांची भर पडत गेली आहे. त्यातून आपला समाज समृद्ध होत गेला आहे. जगण्याची दिशा राम आणि रामायण आपल्या दाखवत आलं आहे, आणि इथून पुढेही दाखवत राहिलं. असंच काहीसं सांगणारं पुस्तक नुकतच वाचनात आलं आणि सहजरीत्या ते वाचून पूर्णही झालं. "द बुक ऑफ राम" हे देवदत्त पटनायक यांचं पुस्तक वाचल्यावर रामायणाकडे पाहण्याचा एक वैयक्तिक दृष्टिकोन मला लाभला आहे. आजवर श्रद्धेतून, भक्तीतून रामाकडे पाहणारे आपण, नकळत का होईना आपल्या अंतरंगातल्या रामायणाकडेही लक्ष देऊ लागतो. आणि हेच निदर्शनास आणून देताना लेखक जे म्हणतो ते पुढीलप्रमाणे,

"अध्यात्म रामायणा" नुसार रावण म्हणजे आपल्यातल्या अहंकाराचं प्रतीक होय. अहंकार म्हणजे इतरांकडून प्रशंसेची अपेक्षा करणारा अहंभाव. मनुष्य जेव्हा धर्माला शरण जातो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सीतेच अपहरण घडतं. इथं सीता हे मनाचे प्रतीक होय. मनुष्याचे मन जेव्हा रावणाच्या (अहंकाराच्या) काबूत असतं.  तेव्हा ते जगावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं. मग तो सभोवतालच्या गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही. आता आपल्याला सीतेची (मनाची) बंधनातून सुटका करायची आहे. आपल्या बुद्धीरुपी हनुमानात दडलेल्या सर्व क्षमतांचा विकास करायचा आहे. जीवनरुपी सागर तरून जायचं आहे आणि रावणाच्या लंकेवर (अहंकाराच्या साम्राज्यावर) विजय मिळवायचा आहे. त्याची सोन्याची लंका जाळून तिचं रामाशी पुनर्मिलन घडवून आणायचं आहे....कारण राम आपल्या अंतर्यामीच आहे, तो आपल्यातल्या स्वत्वापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतोय.

अशी हि रामायणाची कथा वेगवेगळ्या कथांमधून एक एक करत आपल्यासमोर उलगडत जाते आणि त्या प्रत्येक कथेमागचं सार देवदत्तसरांच्या विचारातून ऐकताना आपण हरवत जातो. पुत्र, पती, शिष्य, भाऊ, राजकुमार, राजा, संन्यासी आणि रावणाचा सर्वात प्रबळ शत्रू या भूमिका निभवणारा राम आपल्याला नव्याने या पुस्तकातून भेटतो. प्रत्येक पात्राची भूमिका स्पष्ट करताना लेखकाने मांडलेले विचार आपल्यालादेखील विचार करायला भाग पाडतात. रामायणाचा अंश न अंश माहित असलातरी हे पुस्तक वाचण्याची मजा काही औरच आहे; असं मला वाटतं.

भाषेचा सुटसुटीतपणा, लेखकाच्या विचारांची उंची आणि रामायणाचा सखोल अर्थ आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतो. आयुष्यातल्या अडचणींना नव्याने तोंड द्यायला शिकवणारं हे पुस्तक नकळत तुमच्यात बदल घडवून आणू शकतं. प्रत्येकाने वाचावं आणि आपल्या संग्रही जपावं असं हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा आणि तुमच्या भावना आम्हाला कळवा.

जय श्री राम!!

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form