शारदा संगीत - प्रकाश नारायण संत | Sharada Sangeet - Prakash Narayan Sant | Marathi Book Review

शारदा-संगीत-प्रकाश-नारायण-संत-Sharada-Sangeet-Prakash-Narayan-Sant-Marathi-Book-Review
पुस्तक शारदा संगीत लेखक प्रकाश नारायण संत
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १६२मूल्यांकन ४.५ | ५

वनवास वाचल्यानंतर आपल्याला काहीसं लंपनच्या विश्वात हरवल्यासारखं वाटतं. अजूनही त्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. अशा या लंपनच्या बालविश्वात अडकलेलो असतानाच "शारदा संगीत" हा त्याचा दुसरा भाग हातात आला आणि दोन तीन दिवसांच्या अंतरातच तो संपूर्ण वाचून काढला. लंपनच्या आयुष्यातल्या अनेक घडामोडी पाच कथांच्या माध्यमातून प्रकाश नारायण संत यांनी आपल्यासमोर मांडल्या आहेत. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर घडणाऱ्या लंपनच्या कथा या त्याच्या भाषेत लेखकाने लिहून सोडल्या आहेत(त्याच भाषेत सांगितलं तर) असं म्हणावं लागेल. लंपन आणि सुमी यांच्या आसपास घडणारं वनवासच कथानक इथे घडत नाही. या पुस्तकातल्या कथांचा नायक हा फक्त लंपूच आहे. मला वाटतं  सुमीला लेखकाने काही काळ आराम दिला असावा.

परचक्र या कथेपासून सुरु होणारा या पुस्तकाचा प्रवास शारदा संगीत या अंतिम कथेपर्यंत उत्तरोत्तर सुखद होत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. दूरच्या कुठल्या तरी नातेवाईकांनी लंपनच्या घरात आणि विश्वात मांडलेला उच्छाद आपल्याला परचक्रमध्ये वाचायला मिळतो. त्यातून लंपन आणि घर अगदी ढवळून निघत असताना आजी ते परचक्र परतून लावण्यात यशस्वी होते. आगगाडीच्या रुळांवर या कथेत लंपनने त्या रुळांवर आपलं संपूर्ण आयुष्य अंथरलं आहे कि काय असं आपल्याला वाटायला लागतं. आगगाडीच्या रुळामुळे दोन भाग झालेला लंपूचा परिसर लेखकाने अप्रतिमरीत्या साकारला आहे. त्या रुळांभोवती रेखाटलेले एकूण एक प्रसंग आपल्या समोर जसेच्या तसे उभे राहतात. लंपन आणि आगगाडीची पहिली भेट, किल्ल्यावरून दिसणारी आगगाडी, वळसा घालत धूर सोडत जाणारी गाडी अशा एक ना अनेक भानगडी यात उलगडल्या आहेत. एक वेगळ्या धाटणीच्या या कथेला पारितोषिकही मिळालेलं आहे. राणी का बाग आणि घसरगुंडी सारख्या कथादेखील आपल्या मनात घर करून राहतात. ह्या प्रत्येक कथा आपल्याला अनेक लहानसहान घडामोडींमध्ये अडकवून ठेवतात. पुस्तक बाजूला ठेवलं तरी आपण कुठेतरी घसरगुंडीवर किंवा रुळांवर अडकून पडतो. ह्या सगळ्या कथा वाचत वाचत आपण येऊन पोहोचतो शारदा संगीत या कथेपाशी.

लंपनच्या या कथा जरी वेगवेगळ्या शीर्षकाखाली लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या एकामागोमाग घडत असल्याने कादंबरी सारख्या वाटत राहतात. शारदा संगीत वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं कि पुस्तकाला हे शीर्षक का दिलं गेलं असेल. शारदा संगीत विद्यालयात घडणारी हि कथा आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. संगीताने जसं आपलं मन प्रफुल्लित होतं तसेच काहीसं हि कथा वाचल्यावर आपल्याला होतं. लंपूचे हार्मोनियमवरचे वर्चस्व त्याला कशाप्रकारे जमखंडीकरांचा गुरु बनवते ते वाचल्यावरच तुमच्या लक्षात येईल. शारदा संगीतची एक मधुर सुखद धून अजूनही कानात वाजत असल्याची भावना मनात दाटून राहते. असा या पाच कथांचा हा संग्रह तुम्हाला खिळवून ठेवतो.. लंपनच्या विश्वात.. आयुष्यात.

अप्रतिम भाषा, कथेला लाभलेली वळणं, प्रकाश संतांचा दृष्टिकोन, गोष्टींकडे पाहण्याची सूक्ष्म वृत्ती यांनी ह्या कथा रंगल्या आहेत. भाषेचं सौंदर्य उभं करताना, कथा रेखाटताना, या माणसाला लंपनमध्ये काय सापडलं ते आपल्या लक्षात येते. कुठेही कंटाळा न आणणारं हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायला हवं असं मला वाटतं. वनवास नंतर जर त्याच तोलामोलाच काहीतरी वाचण्यासाठी तुम्ही आतुर असाल तर शारदा संगीत तुमची वाट पाहत आहे. लंपनच्या विश्वात फेरफटका मारत मौज अनुभवण्याची मजा तुम्ही नक्की घ्याल अशी अशा बाळगतो. तुम्हाला ते वाचून काय वाटलं हे आम्हाला  कळवायला मात्र अजिबात विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form