पुस्तक | नाइन्टीन नाइन्टी | लेखक | सचिन कुंडलकर |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २२८ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
तुमचे स्वतःचे काही विचार आहेत का? असतीलच.. सर्वांचेच असतात. पण त्या विचारांची मतं होण्याआधी.. किंवा होताना.. त्यात प्रामुख्याने मोठा वाटा असतो आपल्या राहणीमानाचा.. संगतीचा.. वाचलेल्या पुस्तकांचा.. पाहिलेल्या शहरांचा.. आणि भेटलेल्या माणसांचा. त्यातून निर्माण होतं आपलं स्वतःच असं, एक वेगळं विश्व. ते विश्व कसं निर्माण झालं.. त्याची नक्की प्रक्रिया काय व कशी असते.. हेच या पुस्तकात सचिन कुंडलकर यांनी विविध विषयांवरच्या एकवीस लेखांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे. ते स्वतः चित्रपट दिग्दर्शक असल्या कारणाने चित्रपट सृष्टीतील अनेक अनुभव, अनेक घटना, अनेक व्यक्ती यात समाविष्ट आहेत.
अतिशय सुबक असं मुखपृष्ठ.. त्यालाच साजेस लिखाण.. सुंदर विषय हाताळणी आणि त्याचसोबत बहुआंगी विश्लेषण.. त्यालाच इतर संस्कृतींची.. अनुभवांची जोड.. यामुळे हे पुस्तक तुम्हाला खूप आवडेल. प्रस्थापित विचारांचा प्रभाव कधी बरोबर आहे.. कधी तो कसा चुकीचा आहे.. आणि त्यावरचे हे लेखकाचे मत का झाले? ते खरं आहे की नाही.. हे तपासून पहायची वाचकाला दिलेली मुभा पुस्तकाची जमेची बाजू आहे. अतिशय उत्साहापासून ते नैराश्यापर्यंत.. जेवणापासून ते अगदी जीवनापर्यंत.. कपड्यांपासून ते नग्नतेपर्यंत.. सर्व विषयांवर लेखकाची एक भूमिका आहे, एक दृष्टिकोन आहे, आणि तोच या पुस्तकाचा गाभा आहे.
सिनेसृष्टीतील विशेष माहिती या पुस्तकातून झळकते.. विजय तेंडुलकर यांचा लेखकाच्या आयुष्यावर असणारा प्रभाव हळू हळू आपल्यालाही जाणवतो. वैचारिक चौकटी मोडून काढून.. त्यावर आपल्याला जमेल तशा पद्धतीने स्वतःच्या लोलकांतून जगाकडे पाहण्याची, त्याचे सर्व रंग समजून घेण्याची जी आवश्यकता, एका प्रगल्भ माणसाकडे हवी.. ती स्वतःच्या अनुभवातून उमटलेल्या विचारांनी लेखकाने स्पष्ट केली आहे. काही विशेष संस्कृती.. काही जुन्या प्रथा.. काही माणसं.. काही गोष्टी यावर भरभरून भाष्य केलेलं आहे.. ते तुम्हाला पटू शकतं.. खटकू देखील शकतं.. परंतू दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावर तुम्ही विचार करालच हे निश्चित. म्हणून मला हे पुस्तक विशेष भावलं आहे. तुम्हाला हे पुस्तक तुमची पाटी कोरी करून वाचावं लागेल.. समजून घ्यावं लागेल.
एखाद्या प्रवासाच्या वेळी, सुंदर निसर्ग पाहत असताना.. हे असे प्रश्न तुम्हाला पडतील .. यातील एक एक लेख वाचताना ते विचार करत.. मनातल्या अनुत्तरित प्रश्नाची उत्तर शोधायला हे पुस्तक अगदी योग्य आहे. या पुस्तकाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, वाचलं असेल याची मला खात्री आहे.. आणि नसेल तर आत्ताच शोधा.. वाचा.. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटलं आम्हाला नक्की कळवा!