पुस्तक | मी... वगैरे | कवी | वैभव जोशी |
---|---|---|---|
प्रकाशन | रसिक साहित्य प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ८९ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
"मी... वगैरे" हा वैभव जोशी यांचा कवितासंग्रह वाचताना असं वाटतं की आपल्याला एका शांत, अंतर्मुख करणाऱ्या नदीत हलकेच सोडून दिलं आहे. कविता वाचत जातो आणि प्रत्येक पानाबरोबर आपण आपल्या आत डोकावत राहतो. मी आणि वगैरे या दोनच शब्दांत कवितेचा झरा कसा वाहू शकतो याचा अद्भुत अनुभव या संग्रहातून आपल्याला मिळतो. एकदा वाचायला सुरवात केली कि त्यातल्या प्रत्येक कवितेच्या प्रवाहानुसार आपण भावनांच्या भवसागरात वाहवत जातो.
"सर्वत्र असतोस म्हणे!
असेनास का बाबा...
मी फाडून फेकलेल्या
एखाद्या कवितेत तर नव्हतास ना?"
या संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर त्या आपल्या जीवनातल्या एखाद्या क्षणाला परत समोर जिवंत उभं करतात. एकटेपण, प्रेम, विरह, आणि स्वतःशी असलेली सततची संवादप्रक्रिया — या सगळ्यांचा अतिशय नाजूक आणि संवेदी स्पर्श वैभव जोशी यांच्या कवितांमधून जाणवतो. आपल्या नकळत हरवलेला एखादा हळवा क्षण त्यानिमित्ताने हळूच मन पटलावर येतो आणि एक सुखद वेदना देऊन जातो. प्रेयसी, पाऊस, देव, आई, जीवन, मरण असे अनेक विषय आपल्याला या कवितासंग्रहात कवितेच्या रूपात भेटायला येतात आणि मन प्रफुल्लित करून जातात.
"नशीब म्हणजे पराभवाची गोंडस दुसरी बाजू
काल सुदैवी, आज बिचारा असले काही नसते
रुतणाऱ्या काट्यांचे अप्रूप असते ज्या फुलण्याला
त्याच्यासाठी सुगंध वारा असले काही नसते"
...अशा सहज वाटणाऱ्या पण अंतर्मनाला हलवणाऱ्या ओळी या संग्रहाची खरी ताकद आहेत. "थँक्स कुसुमाग्रज", "जय हे" यांसारख्या कविता आपल्याला नकळत एक रिऍलिटी चेक देऊन जातात. "तर" सारखी कविता तुमच्या गालांवर हसू खेळवल्याशिवाय राहत नाही कारण जे आपण नित्यनेमाने सगळेच पाहत आलोय त्यावर इतकी सुंदर कविता हा माणूस सहज लिहून जातो.
तसेच प्रेमातली गोंधळलेली भावना, आयुष्यातल्या विरामांची नोंद, आणि क्षणांची कविता — हे सगळं फार प्रामाणिकपणे या कवितांमध्ये रुजलेलं आहे. काही कविता एकदम आपल्याचसारख्या वाटतात. जणू त्या आपल्यासाठीच लिहिल्या गेल्या आहेत.
"तुला भेटून कळते काय असते चांदणे
कसे कायम कुण्या देहात वसते चांदणे
.
.
.
तसे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो
तुझ्याइतके कधीही लख्ख नसते चांदणे"
संग्रह वाचून झाल्यावर एक शांत उदास गंध मनात उरतो. तो निघून जावा असंही वाटत नाही आणि विसरावा असंही वाटत नाही. मी वगैरे हा केवळ कवितासंग्रह नाही — तो एक संवाद आहे, आपल्या आतल्या गोंधळलेल्याशी, शोधात असलेल्या "माझ्याशी".
प्रत्येक कविताप्रेमीच्या संग्रही असावा असाच हा संग्रह. भावनांना शब्दरूप देणाऱ्या या कवितांमुळे आपण स्वतःला थोडं अधिक समजून घेतो, थोडं अधिक स्वीकारतो. विशेष म्हणजे, काही कविता अगदी साध्या बोलचालीच्या भाषेत असूनही त्यामध्ये भावनिक जडत्व असतं — जे लवकर न विसरता येण्यासारखं आहे.
त्यामुळे आजच हा संग्रह तुमच्या पुस्तकसंपदेत समाविष्ट करून घ्या, आणि "मी वगैरे" नक्की वाचून काढा.
-© गिरीश अर्जुन खराबे.