पुस्तक | राऊ | लेखक | ना. सं. इनामदार |
---|---|---|---|
प्रकाशन | काँटिनेंटल प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ४१८ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
बाजीराव पेशवा.. हे नाव न ऐकलेले कान हिंदुस्तानात बोटांवर मोजण्याइतके असतील. पण बाजीरावांची कथा म्हणजे फक्त काही मस्तानी नव्हे. त्यांचा जीवनपट सांगण्यासाठी अनेक मालिका आणि सिनेमेदेखील तयार झाले, पण तरीही रंजक कथानकांसाठी इतिहासाच्या पानांना थोडासा वळसाच दिला जातो अस मला वाटतं. बाजीराव म्हणजे एक्केचाळीस लढाया अजिंक्य राहिलेला एक महान योद्धा, संपूर्ण विश्वात सगळ्यात अव्वल सेनापती म्हणून म्हणून विश्वविख्यात असे नाव म्हणजे बाजीराव. एका वेळी दोन्ही हातात दोन दांडपट्टे घेऊन, पायांच्या लकबिने घोडा पुढे पळवित पंधरा मुंडकी एका घावत उडवणारा हा वीर.. ज्याने हिंदुस्तान पुन्हा एकत्र केला. त्याच्या तलवारीला आणि शत्रूस दमवून पकडण्याला सगळेच घाबरून असत. एका पोवड्यात त्याच वर्णन अगदी संस्मरणीय आहे.
"खणखणले भाले तलवार, गर्जती वीर, वीर हर हर.. महादेव रणी दंग झाला,
भिडला योद्धा योध्याला, समररंगणी बाजी आला र.. जी जी जी.."
असे काळभैरवाचे रूप घेऊन रणांगण गाजणारा एक महान योध्दा आपण नीटसा ओळखतच नाही याचं नक्कीच वाईट वाटतं. आणि तुम्हाला हे माहित करून घ्यायच असेल तर "राऊ" ही कादंबरी त्यावर नक्कीच एक उपाय आहे.
"ना. सं. इनामदार" यांच्या लेखणीतून उतरलेल्या या बाजीरावांच्या जीवनकथेवर अनेक मराठी लोकं मोहित आहेत. या कादंबरीचं भाषा साैंदर्य, इतिहासाची साक्ष आणि नात्यांची अलगद कापूरवेल या साऱ्यांची एक सुंदर अनुभव देणारी कलाकृती आहे. यासोबतच त्या वेळची समाजव्यवस्था, जुनी भाषा आणि आजूबाजूची परस्थिती आपल्याला त्या काळात घेऊन जाते. या भावविश्वाला आजुन खुलवत ते म्हणजे काशीबाई आणि बाजीराव यांचा एक गोड नातं. तसेच घरातील इतर अनेक नाती जपण्याचा खटाटोप. रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही कादंबरी नात्यातील वीण तर जपून आहेच मात्र त्यासोबतच वीस वर्षातील एक्केचाळीस युद्धांचे तपशील देखील तितक्याच सहजपणे आणि बारकावे लक्षात घेऊन लिहले आहेत. हे सगळं असतानाही अजिंक्य असलेला योद्धा जेंव्हा कुटुंबकलहात अडकतो तेंव्हा आपल्याच माणसांसमोर पराभूत होतो अन त्या पराभवाच्या दुःखात व्याकुळ होणारा बाजीराव पेशवा रेखाटताना इमामदारांनी ओतलेले शाब्दिक, भावनिक रस मनात घर करून जातात.
त्यांचं सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यांनी बदललेली युद्धशैली, सैन्यातून पायदळ आणि तोफखाना तर वगळलाचं पण सैन्याच्या वेगाने आणि अनपेक्षित हल्ल्याने शत्रूला बेसावध असताना पकडण्यात त्यांच्या सैन्याचा कौतुक करावे तितके कमीच आहे. यात त्यांनी जोडलेली माणसं आणि मुलुख त्यांचं नेतृत्व आणि बुद्धिमत्ता याचंच उदाहरण आहे. मल्हारराव होळकर, पिलाजी गायकवाड, जय्यापा शिंदे, कदम पांडे, पवार, रास्ते, मेहंदळे यांच्या जोडीने बांधलेली सेना काशी हरू शकते? इतकं सैन्य अन इतके जीवाला जीव देणारे गोळा करणारा माणूस फक्त मस्तानी आणि नच गाण्या पुरताच मर्यादित नव्हतं हे सतत पावलोपावली या कादंबरीने दाखवून दिलं आहे.
राऊ केवळ बाजीरावाची कहाणी नाही तर पुण्याच्या मध्यभागात फक्त महादरवाजा व तटबंदी घेऊन उभ ठाकलेल्या शनिवार वाड्याचीही आहे. पुण्याच्या वैभवात भर घालणारा सात मजली वाडा व त्या वाड्यासाठी चिमाजी अप्पांनी घेतलेले कष्ट, त्यात स्थापत्यशास्त्राचे असलेले नमुने साक्षात समोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. हजारी कारंजे, आरसा महल, अनेक प्रकारची दालने अन त्या काळात त्याच असलेलं वैभव कळल्यानंतर शनिवारवाडा आपसूकच साद घालतो ते वेगळं!
हिऱ्याला कोळशाचा काळा रंग मलिन करूच शकत नाही. असच सुंदर आणि मनमोहक आयुष्य जगलेल्या या व्यक्तीचं तुम्हाला नक्कीच अप्रूप वाटेल. तुमचे विचार बदलायला लावणारी ही कादंबरी आहे. त्यांचं आणि मस्तानीच खर नातं काय? घरात कशी परिस्थिती होती? त्यांनी नक्की मराठी मातीला काय दिले? याच उत्तर हवं असेल तर नक्की वाचा ना. सं. इनामदार यांचे लेखणीतून अवतरलेली राऊंची कहाणी.
-© अक्षय सतीश गुधाटे.