पुस्तक | महामाया निळावंती | लेखक | सुमेधकुमार इंगळे |
---|---|---|---|
प्रकाशन | कॉस्मिक प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३७२ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
महामाया निळावंती हे पुस्तक हातात आलं आणि लहानपणी निळावंती या ग्रंथाबद्दल ऐकलेल्या गोष्टी मनात रुंजी घालू लागल्या. निळावंती हा ग्रंथ वाचला कि माणूस निसर्गाशी बोलू शकतो, तर काहींना वेड लागतं किंवा तुमचा मृत्यू तरी होतो इत्यादी अनेक गोष्टी ऐकिवात होत्या. मात्र हे पुस्तक म्हणजे तो ग्रंथ नव्हे; हे पुस्तक मुळात पौराणिक आख्यायिका, ग्रामीण लोककथा यांमधून आढळणारी वनदेवी निळावंती हिच्याबद्दल आहे. हि अशी वनदेवी आहे जी कोणत्याही मृतदेहाला नवजीवन देऊ शकते. लोककथांमधून, आख्यायिकांमधून, पौराणिक गुंतागुंतींमधून वाचलेली ही निळावंती, सुमेध इंगळे यांच्या लेखणीतून समोर येते तेव्हा ती केवळ एक स्त्री, एक देवी किंवा एक रहस्यमय पोथी उरत नाही तर तिचा सुगंध बराच काळ आपल्या आसपास दरवळत राहतो.
सह्याद्रीच्या घनदाट जंगलात घडणारं हे कथानक मानवी भावभावनांचं एक वेगळंच विश्व आपल्यासमोर उभं करतं. त्यात भीती आहे, उत्साह आहे, उत्कंठा आहे, तळमळ आहे, कळवळा आहे; तसेच आपल्या मनात उठणाऱ्या अनेक भावनांचं संमिश्रण या पुस्तकात उतरवण्यात सुमेध हे लेखक यशस्वी झाले आहेत. विक्रम नावाचा एक बाप आपल्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी या भयाण जंगलात निळावंतीच्या शोधात प्रवेश करतो. एक लाकडी पेटी, एक कुत्रा आणि त्याची मुलगी घेऊन तो सह्याद्रीत येऊन धडकतो. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी विक्रम विभुतेचा निळावंतीच्या शोधाचा चाललेला प्रवास वाचकाला गुंतवून टाकतो. विक्रमला निळावंती भेटते का? ती खरंच त्या जंगलात वावरते का? मृत्यूवर विजय मिळवण्यात विक्रम यशस्वी होतो का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल आपण हि कादंबरी वाचूनच केलेली बरी.
महामाया निळावंती हि खरंतर मानवी मनाच्या द्वंदाची कथा आहे. मृत्यूसारखं त्रिकालाबाधित सत्य डावलून त्यावर विजय मिळवू पाहणाऱ्या महत्वकांक्षी माणसाची आणि निळावंतीची हि कथा अनेक अर्थाने आपल्याला खिळवून ठेवते. अनेक पात्रांनी हि कथा रंगवण्यात लेखक यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. विक्रम विभुतेसारखा एक बाप, त्याच्यासोबतची चिमुकली नलू, तांत्रिक घैसासगुरुजी, पाण्यातला पूज्य, चौसष्ट समंधाचा राजा कालसमंध, चारशे वर्षांचा इतिहास असलेला बाजिंदा, निळ्या केसांची माणसं, यादव आणि सेंबियन, देवसरीचा रायरीकर आणि स्वीडनचा हेलबर्ग; अशी एक ना अनेक पात्र आपलीआपली पार्श्वभूमी घेऊन निळावंतीच्या शोधात भरकटताना आपल्याला दिसून येतात. त्या प्रत्येकाचा प्रवास हा वाचकांनी वाचूनच समजून घ्यायला हवा कारण लेखकाच्या शब्दांनी त्यांना उचित न्याय दिला आहे. मृत्यूचे कालचक्र आणि काळ यांचं हे द्वंद्व आपण या पुस्तकातून वाचू शकतो. एका गूढ अशा कथेचा सहवास तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून लाभेल, त्यात तुमच्या भावनांचे अनेक पदर उलगडले जातील, एवढं मात्र नक्की. चारशे वर्षांपूर्वीच्या निळावंतीच्या पोथीचा आधार घेत सुमेध या लेखकाने हि अफलातून कथा फुलवत वाचकांना आपल्या कल्पनाविलासाचे रान मोकळे करून दिले आहे.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व दंतकथांचा अभ्यास करून सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही कादंबरी तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या निळावंतीला भेटण्यासाठी तुम्हीही हि सफर करायला हवी. ती वाचताना तुमच्या मनात झालेली उलथापालथ तुम्ही आम्हाला कंमेंट्स द्वारे कळवू शकता. गूढतेच्या अरण्यातून समाधानाच्या मार्गावर घेऊन जाणारा हा एक रंजक प्रवास आहे. सुखद असा त्याचा शेवट मनाला एक शांतता देऊन जातो आणि तुमच्या आमच्या मनावर कितीतरी काळ राज्य करत राहतो.