पुस्तक | निळासांवळा | लेखक | जी. ए. कुलकर्णी |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ११४ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
कथा म्हणजे केवळ घटना नसते, ती असते एक अनुभूती जी आपल्याला काही ना काही देऊन जाते. आणि जी. ए. कुलकर्णींसारखा लेखक ही अनुभूती इतक्या सूक्ष्म, गूढ आणि प्रभावी पद्धतीने शब्दबद्ध करतात की, वाचकाला कथा संपल्यावरही त्या भावना खिळवून ठेवतात. निळासांवळा हा त्यांच्या लेखनप्रवासाचा प्रारंभ असला तरी त्यातली परिपक्वता आणि प्रगल्भता आपल्याला थक्क करून टाकते. या कथांमध्ये कुठलाही मोठं नाट्यकथानक नाही, मोठमोठी वळणं नाहीत, पण आहे एक विलक्षण शांतता. ही शांतता म्हणजे संध्याकाळी उतरलेला निळासांवळा प्रकाश... ही शांतता केवळ वातावरणात नाही, ती पात्रांच्या आयुष्यात, त्यांच्या दृष्टिकोनात, आणि मुख्यतः त्यांच्या नियतीशी असलेल्या अपूर्ण भांडणात आहे.
गुंतावळ, चंद्रवळ, मुखवटा, सूड यांसारख्या कथांमध्ये जी. ए. एका अशा प्रदेशात घेऊन जातात जिथं नात्यांचं स्वरूप स्पष्ट नाही, संवाद अपूर्ण आहेत. त्यांच्या लेखनातली ही प्रतीकात्मकता जिचं मूळ "वाचकाला स्वतःहून अर्थ लावायला भाग पाडतं" आणि हीच त्यांच्या कथाकलेची खरी ताकद आहे, असं मला वाटतं.
"माणूस आपल्या नियतीपासून फार दूर जाऊ शकत नाही. तो वाट बदलतो, मात्र तरीही दिशा तीच राहते..."
अशी भावना या कथांमधून खोलवर आपल्या मनात ठसल्याशिवाय राहत नाही. कुठलही पात्र हे नायक-खलनायकाच्या व्याख्यांमध्ये बसत नाही. त्याचं अस्तित्वचंं एक झगमगणारं, अनामिक, पण तरीही पूर्ण भासणारं आहे. निळासांवळा वाचताना जाणवतं, की या कथा म्हणजे शब्दांचे बुडबुडे नाहीत, तर गूढ निळसर प्रकाशात अडकलेली माणसं आहेत, आपल्यासारखीच, पण थोडीशी जास्त हरवलेली, थोडीशी अधिक जाणिवांनी झाकोळलेली.
जी. ए. यांच्या कथाशैलीतला तो विरूप जिवंतपणा, तो नियतीच्या अंगावरून अलगद फिरणारा काळजीचा हात वाचताना वाचक श्वास रोखून राहतो. त्यांची भाषा ही सौंदर्यपूर्ण आहे, पण कठीण नाही. ती नजाकतीने वाचकांशी बोलते, त्यांना मोहात पाडते. पुस्तक संपल्यावर एका शब्दात काहीसं सांगायचं झालं, तर निळासांवळा ही केवळ कथा नसून माणसाच्या अंतर्मनाचा निळसर सावल्यांनी भरलेला आरसा आहे. तो आपल्याला आपलं कधीही न दिसलेलं प्रतिबिंब दाखवून आपल्याला आपल्याच आत डोकवायला भाग पाडतो.
जर तुम्ही मराठी साहित्यातलं वेगळं, प्रतीकात्मक, आणि अंतर्मुख करणाऱ्या शैलीचं काहीतरी शोधत असाल, तर निळासांवळा हा संग्रह तुमच्यासाठीच आहे. तो तुम्ही वाचाच, आणि मग तुम्हालाही जर त्या कथांमध्ये तुमचं प्रतिबिंब दिसलं, तर आम्हाला नक्की कळवा.