ट्युजडेज् विथ मॉरी - मिच अ‍ॅल्बम | Tuesdays With Morrie - Mitch Albom | Marathi Book Review

ट्युजडेज्-विथ-मॉरी-मिच-अ‍ॅल्बम-Tuesdays-With-Morrie-Mitch-Albom-Marathi-Book-Review
पुस्तक ट्युजडेज् विथ मॉरी लेखक मिच अ‍ॅल्बम । शुचिता फडके
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाऊस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १९६ मूल्यांकन ४.९ | ५

काही भेटी आयुष्यात उशिरा घडतात! पण त्या उशिरा होणाऱ्या भेटींमध्ये देखील एक वेगळा अर्थ सामावलेला असतो. ट्युजडेज् विथ मॉरी ही अशाच एका विलक्षण उशिरा घडलेल्या, पण खोलवर जिवंत राहिलेल्या नात्याची कथा आहे. एक माणूस मृत्यूशी दोस्ती करतो.. आणि त्याच्याच हातात हात घालून, दुसरा माणूस जगण्याचे.. जीवनाचे सार शोधू पाहतो.. शिकू पाहतो.. हे ज्या प्रकारे पुस्तक आपल्यासमोर हळुवार उलघडून दाखवतं, तसतसं ते आपल्याला आतून हलवून टाकतं. मॉरी.. एक निवृत्त प्राध्यापक, ज्याचं शरीर हळूहळू एका दुर्धर आजारामुळे झिजत चाललेलं आहे, आणि मिच अ‍ॅल्बम.. एक यशस्वी, पण कोरडसर झालेलं आयुष्य जगणारा त्यांचाच माजी विद्यार्थी. ते प्रत्येक मंगळवारी भेटतात.. आणि स्वतःचा शोध घेऊ लागतात. दोन मार्ग निवडतात.. एक मरणाच्या दिशेने, दुसरा आत्मशोधाच्या.

पुस्तक वाचताना सतत एक शांतता व उदासीचं सावट मनावर पसरलेलं असतं. मॉरी आपल्या मृत्यूकडे बघताना भीतीने नव्हे, तर उत्सुकतेने बघतो.. जणू काही मरण म्हणजे एक सुंदर संधि आहे, शेवटाची नाही, तर शेवटाकडे जातानाही शिकण्याची. आणि हेच तो मिचला शिकवतो की, मृत्यू ही अंतिम गोष्ट नाही! जगण्याची ईच्छा संपणे म्हणजे खरं मारण. मरणाच्या समीप असलेल्या मॉरीचं प्रत्येक वाक्य हे जणू जगण्यासाठी लिहिलेलं असतं. त्याच्या शब्दांत एक साधेपणा आहे, पण ती साधी भाषा तुमच्या मनाच्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचते.. मनाला भिडते.

माझ्यासाठी या पुस्तकातली खरी जादू ही त्यांच्या संवादात नाही, तर त्या संवादांमागच्या शांततेत, लपलेल्या अर्थात होती. मॉरी कधी जीवनाच्या चक्राबद्दल बोलतो, तर कधी प्रेमाबद्दल, कधी वृद्धापकाळाबद्दल, तर कधी माफ करण्याबद्दल. पण प्रत्येक मंगळवारचं हे छोटंसं शिक्षण.. म्हणजे आपल्या अनेक वर्षांच्या आयुष्यातल्या विसरलेल्या धड्यांची आठवण वाटते. आपणही कितीतरी वेळा व्यस्त असण्याच्या नादात भविष्याचं गणित मांडत राहतो, पण तेव्हा जीवन हळूहळू पुढे सरकत असतं.. त्या सरकण्याकडे मॉरी आपलं लक्ष वळवून नेतो.. आणि त्यातील गंमत कधी हेरायची हे शिवकावतो. मिचचं वर्णन प्रामाणिक आहे. तो स्वतःच्या अडचणी, स्वतःची भावनात्मक रिकामी झालेली अवस्था कधी लपवत नाही. आणि म्हणूनच वाचक म्हणून आपल्याला त्याच्याशी नातं जोडायला सोपं जातं. कारण आपलंही काहीसं तसंच झालेलं असतं.. आपणही कधी ना कधी, आपल्या कुणा एका मॉरीला विसरलेलो असतो. म्हणूनच ही कथा एक संधी वाटते.. उशिरा का होईना, पण पुन्हा एकदा ‘शिकण्यासाठी’ थांबण्याची.

ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाहीये, तर ते शांततेत जगण्यासाठी आहे. तुम्ही देखील कुणासोबत, कुठल्यातरी जुन्या आठवणीत, कुणाच्या शब्दात, किंवा तुम्हाला न भेटलेल्या मॉरीच्या हळुवार शिकवणीत जगू लागाल. तुम्ही ते पुस्तक उघडाल, आणि काही क्षणांनी असं वाटेल की..

"आपण जगण्यात खूप काही चुकवलं, पण अजूनही बरंच काही उरलं आहे.. आणि हे उरलेलं जगणं, जरा जास्त समजून उमजून जगावं."

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form