चक्र - जयवंत दळवी | Chakra - Jaywant Dalvi | Marathi Book Review

चक्र-जयवंत-दळवी-Chakra-Jaywant-Dalvi-Marathi-Book-Review
पुस्तक चक्र लेखक जयवंत दळवी
प्रकाशन मॅजेस्टिक पब्लिकेशन्स समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १८०मूल्यांकन ४.५ | ५

स्वप्नं पहायची आणि ती पूर्ण करायची जिद्द प्रत्येकाच्याच ठिकाणी सारखी नसते. काही जण ती स्वप्नं उराशी बाळगतात, काही त्यांच्यासाठी लढतात आणि काहींना ती स्वप्नंच दगड बनून खाली खेचतात. जयवंत दळवी यांनी "चक्र" या कादंबरीतून अशाच एका माणसाची आणि त्या भोवती फिरणाऱ्या जगाची झगडणारी कहाणी मांडली आहे. जिथं गरीबी आहे, बेदिली आहे, आणि एक अस्सल मानवी आकांक्षा देखील आहे.

मुंबईच्या झोपडपट्टीतील एका साधारण माणसाच्या जगण्याची ही कहाणी आहे. लंका नावाच्या झोपडीत राहणारा बेन्वा त्याची धडपड, त्याची स्वप्नं, त्याची नाती आणि त्या साऱ्याभोवती सतत फिरत राहणारं ‘चक्र’ यावर दळवींनी प्रकाश टाकला आहे. ह्या चक्रात जो सापडला, त्याला बाहेर पडणं कठीण होतं. आणि दळवींनी ही अडकलेली सिस्टीम, ती जीवनचक्रं इतक्या सहजतेने उलगडून दाखवली आहे की वाचक म्हणून आपण त्या पात्रांबरोबर झोपडीतच जगू लागतो आणि तिथल्याच जीवशैलीत हरवून जातो.

बेन्वाचा संघर्ष हा केवळ भौतिक नाही. गरिबीच्या विळख्यात अडकलेल्या एका स्वाभिमानी जीवाचा वास्तवाशी असलेला संघर्ष आहे. त्याच्या भोवती असलेली पात्रं जशी त्याला मागे खेचू पाहतात, तशी त्याला आधारसुद्धा देतात. त्याची पत्नी, त्याचा मुलगा, शेजारी आणि समाज यांचं बारीकसारीक वर्णन करून जयवंत दळवींनी त्या सगळ्यांना वास्तवाची धार दिली आहे. एक वाचक म्हणून बेन्वाची तुम्हाला दया आल्याशिवाय राहत नाही. बेन्वाचं जीवन म्हणजे त्या झोपडीत घडणाऱ्या शेकडो कुटुंबांचं प्रतीक आहे. त्याची भाषा, विचार, त्याचं प्रेम, राग, क्रोध हे सगळं ठळकपणे या पुस्तकातून आपल्यासमोर उभं राहतं. दळवी यांची लेखनशैली सहज, पण मनात घर करणारी आहे. एक साधं वाक्य वाचताना, वाचक म्हणून आपण थांबतो, त्यावर विचार करतो आणि मगच पुढचं पान उघडतो.

बेन्वाच्या जगण्यात जितकं वास्तव आहे, तितकीच तिथे एक भेसूर शांतता नांदते आहे. कधी वाटतं, हे सगळं संपावं पण तसं होत नाही, ते चक्र सुरूच राहतं. गरिबीचं, संघर्षाचं, व्यवस्थेचं आणि या सगळ्यातून मार्ग काढत जगण्याचं! "चक्र" ही केवळ कथा नाही, तर एक अंतर्मनाच्या आणि परिस्थितीच्या संघर्षाचं प्रतीक आहे. ही एक अशी कहाणी आहे, जिथं यशाच्या कल्पनांपेक्षा जगण्याची गरज मोठी आहे. जिथं प्रत्येक दिवस जिंकल्यावर तो ‘विजय’ नसतो, तर फक्त एक सुटलेला श्वास असतो. कारण दुसरा भेसूर दिवस तुमची परीक्षा घेण्यासाठी तयारच असतो.

जर तुम्ही वास्तववादी, संवेदनशील आणि थेट काळजाला भिडणाऱ्या कादंबऱ्या वाचायला उत्सुक असाल, तर “चक्र” ही कथा तुमच्या काळजाला हात घालते. दळवी यांचं लेखन इतकं खरंखुरं आहे की, ते वाचून झाल्यावरही त्या झोपड्यांचा वास, बेन्वाचा चेहरा आणि त्या चक्राची फिरकी आपल्या मनात सलत राहते. हा अनुभव तुम्हीही घ्यावा असं मला वाटतं त्यामुळे तुम्हीही हे चक्र वाचा, त्यात हरवा आणि मग तुमचं मत आम्हाला कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form