पुस्तक | शिवाजी कोण होता? | लेखक | गोविंद पानसरे |
---|---|---|---|
प्रकाशन | लोकवाङ्मय गृह | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १३४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाने आणि योगदानाने आपल्याला नेहमीच भारावून टाकलं आहे. शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधून जे काही शिकवलं जातं त्यातून खरं तर महाराजांची फक्त एक "झलक" मिळते. पण जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास वैचारिक, सामाजिक दृष्टीकोनातून समोर येतो, तेव्हा लक्षात येतं की महाराज म्हणजे केवळ गडकोटांवर चालणाऱ्या तलवारीचा झणझणाट नव्हे, तर तो एक सखोल लोकविचार आहे, एक प्रगत स्वराज्यविचार आहे. आणि हे समजून देण्याचं काम गोविंद पानसरे यांच्या "शिवाजी कोण होता?" या छोट्याशा पण थेट भिडणाऱ्या पुस्तकाने केलं आहे.
शिवाजी महाराजांविषयी पसरलेली अर्धवट माहिती, धर्माभिमानाच्या नावावर रंगवलेली असत्य पुराणं, आणि समाजात मुद्दाम पेरलेले अपप्रचार यावर खरं तर हे पुस्तक एक सडेतोड उत्तर देतं. शिवाजी कोण होता? या एका प्रश्नावरून सुरुवात करून लेखक महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक थरांपर्यंत आपल्याला घेऊन जातात आणि माहितीच्या आधारावर अडकवून ठेवतात. महाराजांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रियांसाठीचे नियम, प्रजेविषयीची कळवळ, स्वराज्याचं सामाजिक स्वरूप, जातीव्यवस्थेवरचा प्रहार हे सारे पैलू अगदी साध्या, पण मुद्देसूद भाषेत या पुस्तकात मांडले आहेत. कोणत्याही एकांगी दृष्टिकोनातून नव्हे, तर पुराव्यांसह, विश्लेषणांवर आधार घेत महाराजांचं खऱ्या अर्थाने “जननायक” असलेलं व्यक्तिमत्त्व इथे उभं राहतं. जाणता राजा हि बिरुदावली खऱ्या अर्थाने सार्थ असल्याची ठळक जाणीव गोविंद पानसरे आपल्याला करून देतात.
“शिवाजी ब्राह्मणांचेच नव्हते, मराठ्यांचेही नव्हते, मुसलमानांचेही नव्हते. ते सगळ्यांचे होते.”
ही ओळ म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे. जातीधर्माच्या चौकटीत अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न आजही अनेकजण करत असतील, पण गोविंद पानसरे यांच्या लेखणीतून शिवाजी महाराज हे त्या चौकटी मोडणारे, सर्वसमावेशक, समतेसाठी लढणारे राजे होते हे ठामपणे समोर येतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ जरी साधं असलं तरी आतलं लेखन अत्यंत स्पष्ट, प्रभावी आणि ठोस आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडलेलं हे लेखन वाचकाला अडवून व अडवून विचार करायला लावतं. विशेषतः आजच्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर हे पुस्तक एका आरशासारखं आहे जे प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडतं की "आपण महाराजांना खरंच ओळखतो का?", "आपण महाराजांचे विचार खरंच समझून घेतलेत का?"
शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ गौरवाने भरलेला नाही, तो संघर्षाने, न्यायाने आणि समतेच्या झगड्याने भरलेला आहे ही जाणीव लेखकाने फार सोप्या भाषेत करून दिली आहे. या पुस्तकात रक्तपात नाही, लढाया नाहीत आहे केवळ विचारांचं तेज. समाजजागृतीचा एक प्रखर आवाज या पुस्तकातून लेखकाने उठवला आहे. शिवाजी कोण होता? हा प्रश्न वाचकाला स्वतःच्या दृष्टीकोनाचा पुनर्विचार करायला लावतो. महाराजांचा इतिहास जर खरंच समजून घ्यायचा असेल, तर “शिवाजी कोण होता?” ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली पायरी असायला पाहिजे.
तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी असाल, समाजाचं भान बाळगणारे वाचक असाल किंवा केवळ शिवप्रेमी असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. छोटं आहे, पण खोल आहे. सरळ आहे, पण अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांनी भारलेलं आहे. म्हणून आजच हे पुस्तक विकत घ्या, आणि महाराजांची नव्याने ओळख करून घ्या. कारण शिवाजी महाराजांचा विचार हा काळाच्या पुढचा होता आणि आजच्या काळात त्याला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.
जय शिवराय!