पुस्तक | जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल | लेखक | रिचर्ड बाक् । बाबा भांड |
---|---|---|---|
प्रकाशन | साकेत प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
काही पुस्तकं जगण्याला एक नवीन दिशा देतात. काही आपल्याला थांबवतात, विचार करायला भाग पडतात. पण काही पुस्तकं मात्र अंतर्मनात खोलवर झिरपत जातात. "जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल" हे तेच पुस्तक आहे. हि कथा आहे एका समुद्रावरच्या गोंधळलेल्या पक्ष्याच्या साहसी प्रवासाची. हा प्रवास, हि कथा सुरुवातीला एका गोष्टीसारखी वाटते.. पण पानं पुढं सरकत जातात आणि लक्ष्यात येत.. जाणवतं.. की ही गोष्ट नसून एका स्वप्नाचा, काही आकांक्षांचा, आणि प्रामुख्याने "स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या मोडून काढण्याऱ्या".. एका ध्यासाचा प्रवास आहे.
"जोनाथन" हा इतर सीगल पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. त्याला फक्त उडायचं नसतं, सोबतच कसं उडायचंय याचा शोध घेण्याचे वेड असते. नेहमीच्याच, साचलेल्या चौकटीत राहून फक्त अन्नासाठी उडणाऱ्या झुंडीकडे, तो कानाडोळा करतो. त्याला उडण्याच्या झेपतील सौंदर्य जाणवलेलं आहे, तो नवनवीन गोष्टी शिकू पाहतोय. आणि म्हणूनच जेव्हा त्याचा गट त्याला बहिष्कृत करतो.. वाळीत टाकतो, तेव्हा त्याला वाईट वाटतं. आपण सुद्धा अशाच अनेक क्षणांत स्वतःचं वेगळेपण अनुभवलेलं असतं. जोनाथनच्या वेगळेपणाची गम्मत, त्याच्या एकटेपणातच दडलेली आहे. हेच एकटेपण त्याच्या आत्मशोधाचा भाग आहे.. आणि म्हणूनच ही गोष्ट मनाला स्पर्शून जाते.
पुस्तकाचं लेखन अत्यंत प्रतीकात्मक आहे. एका पक्ष्याच्या उड्डाणातून स्वातंत्र्य, शोध, आणि अध्यात्माच्या पातळीवरचा संघर्ष आपल्यासमोर उलगडत जातो. जोनाथनचं प्रत्येक उड्डाण म्हणजे एका नव्या शक्यतेकडे झेप घेणं आहे.. हे हळू हळू आपल्या लक्ष्यात येतं. आणि त्यातूनच तो आपल्या आतल्या मर्यादांना कसा ओलांडतो, हे लेखकाने सुंदर प्रकारे मांडले आहे. रिचर्ड बाक् यांची लेखनशैली ही साधी, तरीही सूक्ष्म अर्थाने परिपूर्ण आहे. शब्दांचा बडेजाव नसतानाही प्रत्येक वाक्य एका धीरगंभीर शांततेनं आपल्यावर परिणाम करत असतं. याचा अनुवाद देखील तितकाच सुंदर आहे. तुम्हाला हे पुस्तक वेळ देऊन.. आरामात.. समजून उमजून वाचायला हवं.
जोनाथनची भेट च्यांग या गुरूशी होते आणि इथे कथा एका आध्यात्मिक वळणावर येते. "गती ही मर्यादा नसते, ती केवळ मनाची कल्पना असते". हे जेव्हा तो शिकतो, तेव्हा आपल्यालाही आतल्या आत जाणीव होते की, आपण रोजच कितीतरी मर्यादा गृहीत धरून वावरात असतो.. "हे शक्य नाही".. "हे आपल्याला जमणार नाही".. "समाज काय म्हणेल".. "लोक काय म्हणतील".. पण हे पुस्तक त्या साऱ्या भिंती हळुवारपणे ओलांडून जातं.. मर्यादेच्या चोकटी कशा मोडाव्या हे आपल्याला शिकवते.
अशा प्रकारची पुस्तकं वाचताना, आपण प्रत्येक पानात स्वतःला शोधायला लागतो. जोनाथन फक्त एक पात्र राहत नाही, तो आपल्यातलाच एक भाग होतो. आपण त्याच्या संघर्षात, त्याच्या भिरभिरत्या विचारांत, त्याच्या प्रत्येक धडपडीत स्वतःचं प्रतिबिंब शोधू लागतो. म्हणूनच हे पुस्तक विषेश काळजाला भिडतं, वाटतं हि गोष्ट आपल्यातल्या उड्डाणासाठी झपाटलेल्या, कधी गोंधळलेल्या पण तरीही आशावादी असणाऱ्या आपल्याच आत्म्याची कहाणी आहे. आणि म्हणूनच.. हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी जरूर वाचायला हवं. सजून नसेल वाचनात आलं तर आत्ताच विकत घ्या आणि वाचा.. आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.