पुस्तक | मऱ्हाटा पातशाह | लेखक | केतन कैलास पुरी |
---|---|---|---|
प्रकाशन | न्यू ईरा पब्लिशिंग हाउस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १४४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
छत्रपती शिवाजी महाराज हा जरी मराठी अस्मितेचा मानबिंदू असला तरी शिवाजी महाराज कसे दिसायचे? हा प्रश्न कित्येक काळापर्यंत मराठी माणसांना अनुत्तरीतच होता. १९३५ सालच्या शिवजयंतीचे निमित्त साधून साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य श्री. वा. सी. बेंद्रे यांनी शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्राचे लोकार्पण केले. आज महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचे जे चित्ररूप पाहायला मिळते त्यात श्री. वा. सी. बेंद्रेंचा मोलाचा वाटा आहेच; मात्र तत्पूर्वीही भारताबाहेर अशी कित्येक महाराजांची चित्र उपलब्ध आहेत, याची सुतराम देखील कल्पना आपल्याला नव्हती. आता कुठे हळूहळू त्यातल्या एक एक चित्रावर प्रकाश पडू लागला आहे आणि त्यातूनच इतिहासाचे एक सुवर्णपान उजळू लागले आहे. अशाच जगात उपलब्ध असलेल्या चित्रांचा धांडोळा "मऱ्हाटा पातशाह" या आपल्या पुस्तकातून केतन पुरी या लेखकाने घेत आपल्यासमोर ज्ञान भांडार खुलं केलं आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एका मित्रामार्फत खरंतर हे पुस्तक हाती आलं आणि क्षणाचाही विलंब न लावता ते वाचून काढलं. एकूण चार प्रकरणे आणि उपसंहार मिळून हे पुस्तक पूर्ण झालं आहे. पुस्तक जरी एका क्षणी वाचून पूर्ण होत असलं तरी ते संपूच नये हि प्रामाणिक भावना सतत मनात दाटत राहते. आणि यातुनच केतन पुरींच्या ओघवत्या लेखन शैलीचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते. शिवरायांचे रूप, त्यांचे बोलणे, देहबोली यांवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेक पुस्तकांचा, ग्रंथांचा अभ्यास करून हे पुस्तक साकारण्यात आले आहे. शिवकाळातील विविध प्रसंग, त्यांचे चित्रण यांची मुद्देसूद बांधणी या पुस्तकात केलेली आहे. एक वाचक म्हणून आपण हि सगळी माहिती साठवत असताना शिवरायांचे रूप नकळत आपल्या डोळ्यासमोर तरळत राहते.
शिवरायांचे बोलणे कसे असेल यावर आजवर फार कमी संशोधन झाले असून खूप कमी प्रमाणात त्याबद्दल माहिती उपलब्ध आहे. मात्र शिवभारत, तत्कालीन पत्रे व शिवरायांना भेटलेल्या माणसांनी लिहून ठेवलेले दस्तऐवज यांवरून काहीसा अंदाज आजही लावता येऊ शकतो. त्याबद्दलची आपली चिकित्सादेखील लेखकाने या पुस्तकात मांडली आहे. एकूणच महाराजांच्या इतिहासाच्या ह्या अंगाबद्दल बोलताना अगदी मोजक्या पण समर्पक शब्दात लेखक म्हणतात कि,
"हा काहीसा दुर्लक्षित राहिलेला विषय. दख्खनच्या स्वामीचा सर्वात पहिल्या श्रीमंत मऱ्हाटा पातशहाचा विलक्षण, अपरिचित आणि वैभवशाली इतिहास. आपले महाराज, आपला राजा, आपला छत्रपती नेमका कसा दिसत असेल याची पूर्ण कल्पना या समकालीन चित्रांवरून येते. शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाजवळ जाण्यासाठी ही चित्रे आपल्याला भरपूर मदत करतात. शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहणे जरी आपल्या नशिबात नसले तरीही या चित्रांवरून आपण शिवरायांना सहजपणे कल्पनेच्या विश्वात चीतारू शकतो. अर्थात आपल्यावर हे उपकार आहेत हर्बर्ट डी यागर, निकोलाओ मनुची व निकोलस वीटसेनचे. तसेच प्रा.ग. ह. खरे, इतिहासमहर्षी वा. सी. बेंद्रे यांचेही. त्यांच्या या ऋणातून महाराष्ट्र कधीही उतराई होऊ शकत नाही."
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने वाचावे असे हे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल केतन पुरीचे मनःपूर्वक आभार. शिवरायांचा इतिहास समजून घेण्याआधी जर आपण हे पुस्तक वाचून काढले तर आपल्या इतिहास अवलोकनाला एक वेगळीच दिशा मिळेल एवढं मात्र नक्की. हे पुस्तक वाचल्यानंतर कादंबरी आणि संशोधनपर लेखन यातला फरक वाचकांच्या नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या तरुण वयात इतका गाढ अभ्यास करणारा हा लेखक आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेला हा ठेवा आपण नक्कीच वाचला पाहिजे, आपल्या आप्तजनांपर्यंत देखील तो आपण पोहोचवला पाहिजे. त्यामुळे आजच हे पुस्तक खरेदी करा, कुठूनतरी मिळवा आणि वाचून तुमचा प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा. जय शिवराय!