स्मरणगाथा - गो. नी. दाण्डेकर | Smarangatha - Go. Ni. Dandekar | Marathi Book Review

स्मरणगाथा-गो-नी-दांडेकर-Smarangatha-Go-Ni-Dandekar-Marathi-Book-Review
पुस्तक स्मरणगाथा लेखक गो. नी. दाण्डेकर
प्रकाशन मृण्मयी प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ५५८ मूल्यांकन ४.८ | ५

गोपाळ निळकंठ दांडेकर या अवलिया लेखकाशी परिचय तसा खूप लवकर झाला. नीटसं स्मरत नाही पण सहावी कि सातवीला त्यांच्या शितू कादंबरीतील एका प्रसंगावरचा धडा मराठीच्या पुस्तकात होता. तिथूनच खरंतर त्यांच्या लेखनाची आवड निर्माण झाली. तदनंतर ओघानंच शितू हाती आलं, काही तासात ते वाचूनही झालं, अन लागलीच आप्पा दांडेकरांची साहित्यसंपदा आपलीशी करत एक एक करून वाचून काढायला सुरवात केली. "मोगरा फुलाला", "तुका आकाशाएवढा", "दास डोंगरी राहतो" हि संतचरित्रे वाचता वाचता "शितू", "माचीवरला बुधा", "पवनाकाठचा धोंडी" हि साहित्यमालाही वाचून काढली. यातून एक जाणवलं हा माणूस साधा नाही, नक्कीच काहीतरी वेगळं रसायन या माणसात आहे, मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली आणि "स्मरणगाथा" नावाचा आप्पांच पुस्तक हातात आलं. हे पुस्तक हातात आल्यावर आणि ते वाचल्यावर हा माणूस कसा घडला याची प्रचिती आपल्याला येते. वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडलेला हा माणूस कसा जगला, कसा घडला याच सांगोपांग वर्णन आपल्याला यात वाचायला मिळतं.

स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊन देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची शपथ आपल्या शाळकरी मित्रांपुढे घेत आणि ते मिळवल्याशिवाय तोंड न दाखवण्याचं ठणकावून सांगत हा वीरपुरुष घरातून पळाला आणि थेट येऊन पोहोचला मुंबईत. सत्याग्रहाची कामे करत काही काळ त्यांनी मुंबईत काढून नंतर आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. नाटक, रंगभूमी यांची आवड असलेला हा मुलगा पुण्यात ठिकठिकाणी भटकला, नको नको ती कामे केली, ब्राम्हण असून नाही नाही ते अन्न खाल्लं. ब्राम्हणाचा मुसलमान होता होता वाचलेला, सुंता होता होता राहिलेला हा मुलगा पुढे नाशिकला आला. एका लाकडाच्या वस्तू बनवणाऱ्या दुकानात कामाला लागला आणि त्यातच त्याचा परिचय गणपतराव जोशी यांच्याशी झाला. त्यांच्यासोबत दोन वर्षे राहिल्यावर व पुढे ते निवर्तल्यावर काय करायचं हे माहित नसताना आत्महत्या करायला गेलेला हा मुलगा एका धनगरासोबत कोकणात जातो आणि त्याच ठिकाणी त्याला गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळते. गाडगे महाराजांचा शिष्य होत पुढे गावोगावी कीर्तन करत हिंडू फिरू लागतो. पाच दहा हजार लोकांच्या समुदायापुढे कीर्तन करून त्यांचे समुपदेशन करू लागतो. अध्यात्मातली हीच गोडी त्याला आळंदीला घेऊन येते. तिथे ते ज्ञानेश्वरीची पारायण करत, ज्ञानोबांचे अमृतानुभव शिकू लागतात. प्रसंगी भंडारा डोंगरावर जाऊन देखील हा माणूस कित्येक दिवस राहिला आहे. माउलींचे तत्वज्ञान समजून घेता घेता शंकराचार्यांचे तत्वज्ञान समझून घेण्याची इच्छा मूळ धरू लागते. हेच निमित्त साधत गडी आळंदीवरून धुळ्याला येतो, काकाशास्त्रींचा शिष्य होतो. त्यांच्या सांगण्यावरून घरी जाऊन येतो, नर्मदा परिक्रमा करतो. असा हा सगळा अफलातून प्रवास करणारा पुरुष साधा असू शकतो? नाही मुळीच नाही. शक्यच नाही!

या आपल्या स्मरणगाथेच्या अंती लेखक म्हणतो, "तेराव्या वर्षी घरून पळालो. आज तिसावं वर्ष आहे. सतरा वर्षे धावलो. पडलों. पुन्हा उठून धडपडत चालू लागलो. न दमता. न खचतां." हे पुस्तक वाचल्यावर हे तंतोतंत खरं असल्याची जाणीव आपल्याला होते. स्मरणगाथा वाचताना कितीतरी अचाट गोष्टी आपल्याला समजतात. नकळत का होईना तुकाराम बुवा, ज्ञानोबा माउली आपल्याला समजू लागतात. गाडगेबाबांचा संग लेखकाच्या निमित्ताने थोडाबहुत आपल्याही वाट्याला येतो. कित्येक अडचणींना तोंड देत, मरणाच्या दारातून स्वतःला सोडवत हा माणूस घडला ते आपल्याला यात वाचायला मिळेल. आप्पा दांडेकरांबाबतचा आदर शतपटीने वाढल्याशिवाय राहत नाही. संतचरित्रे रेखाटणारा हा माणूस स्वतःही त्या पदाला पोहोचला असल्याची जाणीव आपल्याला होते.

या पुस्तकातून आपण आपला कंफर्ट झोन तोडायला शिकतो. आपल्या शरीराच्या, मनाच्या ज्या कक्षा आहेत त्या कितीतरी प्रमाणात रुंदावतात. आपण एका ठराविक चौकटीत जगतो आणि त्याच चौकटीत मरतो. पण हि चौकट किती विस्तृत असू शकते याची कल्पना आपल्याला यातून येते. आप्पांचा काळ आणि आताचा काळ यात जमीनअस्मानचा फरक आहे, मात्र त्यातून जे शिकण्यासारखं आहे ते आजही तितकंच जिवंत आहे. तुम्हीही हे पुस्तक वाचून बघा, नकळत का होईना तुमच्यात काहीअंशी बदल होईल असं मला वाटतं. तुम्हाला तो जाणवला किंवा नाही जाणवला तरी तुमचं मत आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form