पुस्तक | सामान्यांतले असामान्य | लेखिका | सुधा मूर्ती | उमा कुलकर्णी |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | तन्वी विकास पाटील |
पृष्ठसंख्या | १७८ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
'सामांन्यातले असामान्य' नावच जरा वेगळं, विचार करायला भाग पाडणारं आहे ना? काय असतं अश्या सामान्य माणसांमध्ये? खरचं सामान्य माणूस ही असामान्य असू शकतो का? सुधा मूर्तींच्या आयुष्यात आलेले अनेक अनुभव, प्रसंग आपण त्यांच्या पुस्तकांमधून वाचलेले आहेत. जसे त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग त्यांना लाखमोलाची शिकवण देऊन गेले, अगदी तसेच त्यांच्या आयुष्यात आलेली, त्यांना भेटलेली प्रत्येक व्यक्ती वेगळीच होती! प्रत्येकाने त्यांना काही ना काही शिकावलं. अशाच सर्वसामान्य माणसांमधून निवडलेल्या निवडक, अद्भुत पण काहीतरी वेगळचं असलेल्या सामांन्यातल्या असामान्यांची या काही कथा. त्यांचे स्वभाव आणि वेगळेपण यातून तुम्हाला लख्ख दिसेल.
या पुस्तकात एकुण एकोणीस कथा आहेत. यांना कथा न म्हणता, एकोणीस वेगवेगळ्या व्यक्तींचा परिचयच आहे, अस मला वाटतं! प्रत्येक माणूस दुसऱ्यापेक्षा वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव ही वेगळा, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी पण पुस्तकाचं मूळ एकच-माणसांची केलेली अचूक पारख! या कथा जेव्हा वाचून पूर्ण झाल्या तेव्हा मला अनोळखी पण आपल्याच माणसांनाच भेटल्यासारखं वाटलं. प्रत्येकाची पूरेपूर ओळख झाली आणि नकळतच आपल्या पैकी काही जण नव्हे तर, आपणही कमी अधिक त्यांच्या सारखेच आहोत हेही जाणवलं!
पुस्तकातील माझी आवडती बाजू म्हणजे कथांना दिलेली आकर्षक शीर्षके, आणि सोबतची विशेषणे! या दोन्हीतून कथा डोळ्यांसमोर येते आणि वाचून अर्थ लागतो. मग त्यात 'बंडल बिंदप्पा 'असो वा 'फस्ट रँक फणी'. अशी एक, दोन नाही सगळीच नावे बिनचूक आणि चपखल स्वभावाशी साम्यसाधणारी आहेत. प्रत्येकाचं नाव वाचल्यावर हे असचं का हा प्रश्न पडतोच आणि तोच प्रश्न आपोआपच वाचनाची गोडी, आवड निर्माण करतो आणि कधी एकदा या व्यक्ती विषयी जाणून घेतोय, असं वाटतं. त्यांच्यातील सुप्त गुणांना जपण्याने ते कसे असामान्य होत गेल्याची ही कथा.
जसा आपला भारत देश विविध संस्कृतींचा, प्रदेशांचा, परंपरांचा आहे, अगदी तसंच हे पुस्तक विविध स्वभाव, प्रवृत्ती, दृष्टिकोन यांनी नटलेलं आहे. खरचं, या जगात असंख्य माणसे आहेत. पण त्यातील साम्य एकच प्रत्येकाच असलेलं 'खास व्यक्तित्व'! सुधा मूर्ती आणि त्यांची ग्रंथसंपदा यांच्याबद्ल लिहण्यासारखं खूप काही आहे. त्यात वाचण्यास सगळेच पुस्तकं छान आहेत पण मला वाटतं त्या वाचनाची सुरुवात इथून करायला हरकत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची माणंस तुम्हाला नक्की भेटतीलच पण प्रत्येकजण काही ना काहीतरी देऊन जाईल. समाज जसा विविध घटकांनी भरलेला असतो ना अगदी तसाचं विविध माणसांनी, स्वभावांनी भरलेला एक वेगळाच समाज पाहायला मिळेल! म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने आर्वजून वाचाच! वाचाल तर समजेल की प्रत्येक माणसाच्या अतरंगी दिसण्यामागे, त्याचा अतरंगी स्वभावही दडलेला असतो!
-© तन्वी विकास पाटील.