पुस्तक | अस्तित्व | लेखिका | सुधा मूर्ती | प्रा. ए. आर. यार्दी |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | तन्वी विकास पाटील |
पृष्ठसंख्या | १०० | मूल्यांकन | ४.२ | ५ |
'अस्तित्व' म्हणजे नेमकं तरी काय? याच प्रश्नाच्या शोधातून सुरू झालेली एक उत्कंठावर्धक कहाणी! स्वतः चा जन्म, स्वतः ची ओळख, पात्रता, कुटुंब आणि या साऱ्यांपलीकडची एक विस्मयकारक कथा! जी वाचल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन च बदलून जाईल. माणुसकीचं उच्च दर्जाच दर्शन घडवून देणारी सुधा मूर्तींच्या विवेचक लेखणीतून उतरलेली कादंबरी-अस्तित्व. 'सुधा मूर्ती' हे नाव कानी पडताच सुरेख, सुरेल शब्दांची गुंफण आणि शब्दांची सरलता पण गूढ अर्थ यांचा अनुभव येतो. साध्या, सोप्या भाषेत जीवनाचा सार मांडायला सुधा मूर्तींकडूनच शिकायला हवं. सुधा मूर्ती हे नाव माझ्यासाठी अत्यंत जवळचं आणि तितकचं जिव्हाळ्याचं!त्यांच प्रत्येक पुस्तक माझ्यासाठी एक पर्वणीच असते. मूर्तींच प्रत्येक पुस्तक म्हणजे एक नवी प्रेरणा आणि उमेदच!! सुखसमाधानात आयुष्य जगणाऱ्या, आनंदी असणाऱ्या आपल्या सारख्या एका व्यक्तीला जर अचानक कळलं कि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारे आपले आई-वडील आपले नाहीतच; किंबहुना आपणच त्यांच्या रक्ताचे नाहीत, तर काय होईल? विचार तरी केलाय का असा कधी? बसेल का विश्वास या गोष्टीवर? नाही ना!! पण अशाच अनपेक्षितपणे आणि अचानक उठलेल्या वादळामुळे पार आयुष्य बदलून गेलेल्या मुकेश ची ही कहाणी.
अचानक उठलेलं एक वादळ, आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतं. एक छोटीशी गोष्ट आपल्याला आपल्या कुटुंबापासून खरंच वेगळं करू शकते का याचा विचार करणाऱ्या मुकेशच्या डोक्यात अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागतात अन् याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुरू होतो स्वतच्याच अस्तित्वाचा शोध! मुकेशच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी, त्याच्या मनाची झालेली घालमेल, व्याकुळता अन् स्वतः च अस्तित्व शोधण्यासाठी केलेली धडपड नकळतच आपल्याला हरवून जाते. जणू आपणच या अस्तित्वाच्या प्रवासात त्याचे साथीदार, सोबतीला आहोत, याची जाणीव मनाला हुरळून टाकते.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील निरागस, शांत, संयमी पात्र आणि त्यांचे व्यक्तिस्वभाव, जे वाचकांना आपल्याकडे अलगद ओढून नेतात आणि आपोआपच वाचकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती जाणवू लागते, ही खरी जादू आहे सुधा मूर्तींच्या शब्दांची! पोटच्या पोरापेक्षा मुकेशवर जास्त प्रेम करणारी अम्मा, मुन्ना मुन्ना म्हणत नेहमी सोबत असणारी, पाठराखण करणारी बहिण नीरजाआणि या सर्वांपासून दूर काहीच माहिती नसलेली अनभिज्ञ मुकेशची पत्नी वासंती!! प्रत्येक नात्यातून बाहेर पडणारं एक वेगळचं रसायन वाचकाला मोहित करून टाकते.
खरंच, कोण असेल मुकेश? काय असेल त्याच खरं नाव? कोण असतील त्याचे खरे आई-वडील? कुठे असतील? कुठे जन्माला आला असेल तो? काय असेल त्याचा भूतकाळ? आणि काय असेल त्याच्या आई-वडिलांची कहाणी ज्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला असं दुसऱ्याच्या ओटीत घातलं. फक्त विचार अन् विचारच घोंघावत राहतात! खरंच, असंही असू शकेल का याची जाणीव पुस्तक वाचताना वेळोवळी येते. आपल्याही बाबतीत असं काही घडलं असेल का असा विचार क्षणभर डोकावून जातो.
मला काय लिहू, किती लिहू आणि किती नको असं होतयं. सुधा मूर्तींच्या जादूई लेखणीतून उतरलेली ही एक अविस्मरणीय कलाकृती आहे! जणू एक आश्चर्याचा धक्का देणारा सुखद चित्रपटच! जितकं बोलावं तितक कमीच! पण जेव्हा कधीही वाटेल ना की आयुष्याचा सार कशात आहे हे जाणून घ्यायचं आहे, मानलेली नाती खरी की रक्ताची नाती श्रेष्ठ याची प्रचिती घ्यायची आहे तर नक्कीच वाचा! नाही तुमचं भान हरवायला भाग पाडलं तर नवलच! म्हणून तुम्ही हे पुस्तक नक्की आर्वजून वाचाचं. कृतज्ञपणा म्हणजे काय हे समजेल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलेल अन् आयुष्य आणखी सुंदर आणि आनंदी वाटेल. त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुमचं 'अस्तित्व' काय आहे ते.
-© तन्वी विकास पाटील.