पुस्तक | गुनाहों का देवता | लेखक | धर्मवीर भारती |
---|---|---|---|
प्रकाशन | वाणी प्रकाशन ग्रुप | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २६४ | मूल्यांकन | ५ | ५ |
या पुस्तकाबद्दल वाचक मित्रांमध्ये चर्चा झाली नाही असं होणारच नाही. प्रत्येक वाचकाने कधीतरी याबद्दल ऐकले असेलच. हिंदी साहित्यातील अद्वितीय अजरामर अशी प्रेमकहाणी, म्हणजेच "धर्मवीर भारती" लिखित एक सुंदर.. प्रेमळ.. निराळी.. कादंबरी "गुनाहों का देवता". सहा-सात दशकं वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कथा आहे. या पुस्तकावर किती लिहिलं आहे.. किती भाष्य झालं आहे याला माप नाही. हिंदी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरलेली कादंबरी. प्रेमाचे नवीन वर्तुळ समोर आणणारी.. अनेक आयाम मोडून तुमच्यासमोर प्रेमाची भाषा.. त्याची बंधने.. त्यातून निर्माण होणारा जिव्हाळा.. गैरसमज.. आणि बरंच काही.
जितकी कथा रंजक तितकीच तुम्हाला विचार करायला लावणारी. सहसा अशी पुस्तकं एका बैठकीत वाचून होतात. हे मात्र सलग मला वाचण्याचे धारिष्ट्य झाले नाही. पुस्तक हळू हळू आवाका वाढवते आणि ते समजून घेताना आपण त्यात गुंतून जातो. कधी कधी पुस्तकाची पानं समोर रेंगाळत असतात आणि मनात भलतेच विचार चालू लागतात. "सुधाने असं करायला नको होतं.. चंदर ने असं करायला नको होतं.. मनमोकळे बोलायला हवं.. बिनती सोबत असं का होत आहे... सगळ्यांच्याच मनात किती गुंता आहे?" या आणि अशाच अनेक विचारांच्या मुंग्या मनाला चावा घेत असतात. आणि पुस्तक वाचत असतो पण पानं उरकत नाहीत. आणि ती उरकली नाहीत.. याचा खरं तर मला आनंद आहे.
पुस्तकाचे नाव वाचूनच तुम्ही अनेक प्रश्नांनी घेरले जाल. नक्की काय गुन्हा झालाय आणि कोणाकडून? नक्की हे चांगल्या प्रकारे आहे की उपरोधिक पणे? व प्रेमकहाणीला नाव गुनाहों का देवता असं का? देवता नक्की कोण असेल? प्रेमाच्या शोधात, त्याच्या खऱ्या अर्थाच्या शोधात असणाऱ्या या तिन्ही व्यक्ती कशा बदलतात.. कशा एकमेकांशी वागतात.. कशा एकमेकांत अडकतात हे वाचताना अनेक भावानांमधून आपला प्रवास होतो. कधी आनंद.. कधी त्रास.. कधी समाधान.. कधी चिंता.. कधी गंम्मत.. कधी शंका.. कधी मत्सर.. आणि सर्वात महान त्याग.. अशा विविध प्रकारच्या विचारातून वाचकाचा प्रवास होतो आणि पुस्तकाच्या पानासोबत तुमचं मन हळवं होतं. आणि हे पुस्तक मनाचा एक कोपरा नाही तर, पूर्ण मनाचा.. मेंदूचा.. आणि तुमच्या जीवनाचाही ताबा घेतं. असं पुस्तक कोणाला वाचू वाटणार नाही. मला खात्री आहे, तुम्ही हे पुस्तकं वाचलं तर तुमच्याही आयुष्याचा कायमचा ताबा घेईल.
मोजकीच पात्र.. सुधा, चंदर, बिनती ही प्रमुख.. डॉ. शुक्ला, पम्मी, बर्टी, गेसू, कैलाश ही काही सहायक पात्र. यांचं उभं केलेलं एक छोटं विश्व. त्यात देखील फक्त दोन वर्षाच्या आतल्या घटना व त्याचे झालेले परिणाम. यातून निर्माण झालेली परिस्थिति तुम्हाला विचार करायला तर लावेलच पण सोबतच प्रेमाच्या आठवणी ताज्या होतील. हळू हळू मनावरील एक एक आवरण निघून जाईल. प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचायलाच हवे. माझ्या वाचनात हे पुस्तकं इतक्या उशिरा आले.. याची आता मला खंत वाटत आहे. तुम्ही हे पुस्तक आधीच वाचले असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.