नांगी - संतोष वरधावे | Nangi - Santosh Vardhave | Marathi Book Review

नांगी-संतोष-वरधावे-Nangi-Santosh-Vardhave-Marathi-Book-Review
पुस्तक नांगी लेखक संतोष वरधावे
प्रकाशन रोहन प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १३३ मूल्यांकन ४.५ | ५

नुकतंच रोहन प्रकाशनच नांगी हे पुस्तक हाती आलं. लेखक संतोष वरधावे यांचा हा चार कथांचा संग्रह माणसात दडलेल्या विषाशी आपली ओळख करून देतो. हे विष नक्की कसलं आहे ते पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच आपल्या लक्षात येईल. मानवाकृत परंतु विंचवाची नांगी डोक्यातून बाहेर निघालेलं हे मुखपृष्ठ अत्यंत बोलकं आहे. अंगरखा, बुजगावणं, नांगी व पाणी या चार कथांमधून वेगवेगळ्या विषयांना हात घालत लेखक माणसातल्या विंचवाची जाणीव आपल्याला करून देतो. आपला मेंदू आपलं शरीर चालवत असतो, ज्या काही घडामोडी आपण पाहतो, भोगतो त्याची प्रतिक्रिया मेंदुपटलावर उमटत असते. सतत त्याच त्याच गोष्टी उपभोगून एक दिवस ते सगळं संपवून टाकण्याचं विष याच मेंदूत भिनत जातं. अतिप्रमाणात चढलेलं विंचवाच विष देखील असंच हळूहळू चढत माणसाच्या जीवनाचा घोट घेतं. असाच काहीसा आशय घेऊन या कथा लेखकाने आपल्या अनोख्या शैलीत लिहल्या आहेत.

स्वप्नांच्या मागे धावून हताश झालेल्या मुलाची  व त्याचा जीव वाचवून पुन्हा आशेचा किरण दाखवणाऱ्या फकीराची कहाणी आपल्याला अंगरखा मध्ये वाचायला मिळते. मात्र तो किरण नाहीसा होताच मुलाच्या होणाऱ्या अवस्थेचा फायदा उठवणारी विचित्र माणसं आणि त्यांच्यातल विष बाहेर ओकत हि कथा संपते. बाबू सरदेसाई व त्याच्या भवताली वावरणाऱ्या माणसांनी त्याच्या आयुष्याची केलेली हानी, त्यातून नकळत अंगात भिनत गेलेलं विष तुम्हाला बुजगावणं मध्ये वाचायला मिळतं . नांगी या कथेत सावबा सारखा आडदांड गाडी आपल्याच मित्राच्या जाळ्यात अडकून मानवी महत्वकांक्षेच्या विषाचा बळी ठरतो. तर बजाबा नावाचा एकेकाळचा जहागीरदार मात्र कालौघात पालिकेचा कर्मचारी झालेला माणूस आपल्याला पाणी या कथेतून भेटतो. त्याच्या आयुष्याच्या झालेल्या होळीतून तयार झालेलं विष त्याच्या सर्वांगात भिनलेलं आपल्याला पाहायला मिळतं.

परिस्थिती माणसाला कमजोर किंवा मजबूत करत असते. नियती आपल्यासमोर नेहमीच दोन पर्याय ठेवत असते. मात्र अंगात विष भिनलेला माणूस नेहमीच नकारात्मक पर्यायाकडे ओढला जातो आणि तिथेच सगळ्याची माती होते. कसलाही खंड न पडता वेगाने सरकणारं कथानक, त्याला हवं ते वळण देत वाचकांना बांधून ठेवण्याची कला, शेवट न करताही सूचक शेवट वाचकांना सुचवणाऱ्या ह्या कथा अतिशय छान रंगल्या आहेत. एका बैठकीत वाचून होणारं व मेंदूला खतपाणी घालणारं हे पुस्तक तुम्ही जरूर वाचून पहा. एका वेगळ्याच विश्वात ते तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मला तर या कथा वाचताना फार मजा आली, कोणीतरी आपल्या बाजूला बसूनच गोष्ट सांगत असल्याची जाणीव या कथा वाचताना मला झाली. त्यामुळे तुम्हीही हे पुस्तक लवकर हाती घ्या आणि तुमचं मत आम्हाला कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form