पत्र.. माय मराठीस (मराठी भाषा गौरव दिन विशेष)
प्रिय माय मराठी,
पत्र लिहावं असं आज वाटलं, कारण एक खंत मनात होती. खरं तर मराठी भाषेत लिहिण्याचे प्रसंग खूपदा आले.. पण मराठी भाषेसाठी लिहिण्याची ही पहिलीच वेळ. ज्या भाषेने पहिल्यांदा परीक्षेच्या निमित्ताने का होईना पण पत्रांची ओळख करून दिली त्या भाषेसाठी पत्र लिहिताना मनाला किती धन्यता वाटते.. हे शब्दात नाही सांगता येणार! आज "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून पत्र, एरवी इतकं नाही बोलत मराठीत कोणीच. पण निदान या पत्रातला शब्द न् शब्द, तुझ्या अनमोल शब्द भांडारातून वेचून तुझ्याच चरणी अर्पण करण्याचा हा वेडा प्रयत्न!
कुटुंब मराठी, शाळा मराठी, मित्र मराठी आणि शालेय शिक्षण सुध्दा मराठीतूनच. पहिलं पुस्तक हातात पडलं (श्यामची आई) ते देखील मराठीच! मग साहजिकच तुझ्याबद्दल आपुलकी जास्त! पुढे जाऊन पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली, याला कारणीभूत सुध्दा मराठी भाषाच. माझ्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मी वाचलेली पुस्तकं, ज्यांनी माझ्या विचारांवर आणि माझ्या स्वभावावर चांगला दूरगामी परिणाम केला आहे त्यात मराठी भाषेतली पुस्तकंच जबाबदार आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे! कुठलीही भाषा माणसाला ज्ञानाच्या दृष्टीने प्रगल्भ करतेच, पण मातृभाषा माणसाला मनानेही प्रगल्भ बनवते. मनावर झालेले मातृभाषेचे संस्कार कधीच पुसले जाऊ शकत नाहीत.. असं मला वाटतं आणि माझ्या मनावर झालेले भाषेचे संस्कार मराठीचे आहेत जिथे संतांची परंपरा आहे, सेवेची परंपरा आहे, कलेची आसक्ती असणारे हि भाषा आहे आणि याचा मला गर्व आहे. आज मला तुझ्याबद्दल जे वाटतं, ते मला लिहिता येण्याचं भाग्य सुध्दा मला तुझ्या मुळेच लाभले. यासाठी मी तुझा ऋणी आहे आणि कायम राहीन. म्हणतात, अतिपरिचयाने दुरावा येतो! पण तुझा परिचय फक्त आणि फक्त लोभसच आहे.
मातृभाषा मराठी आहे म्हणून फक्त मराठी बद्दल अभिमान वाटतो असं नाही. या भाषेचं वैविध्यपूर्ण वाङमय सुध्दा मला तितकीच भुरळ घालतं. विषयाला खुलवण्यामागे लेखकांच किंवा कवीचं यश असतं आणि ते लिखाण निश्चितच भाषेचा अलंकार असल्यासारखं शोभतं. अशा कित्येक अलंकारांनी ही भाषा नटवली गेली आहे. या भाषेतल्या 'अलंकारांचाच' वापर करून जेव्हा याच भाषेची महती वर्णीली जाते तेव्हा दुग्धशर्करा योग साधून आल्यासारखं वाटतं. इतकं अवर्णनीय साहित्य लाभल्यानंतर कोणालाही भरून पावल्याचा आभास होईल!
बोलण्याचा प्रयत्न केल्यापासून तुझ्याशी गट्टी जमली असली तरी आता इतर भाषांशी सुध्दा संबंध येतोच आहे, पण कितीही म्हटलं तरी तुझं माझं नातं 'नाळेशी' निगडित आहे! आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठी भाषेतलेच शब्द ओठांवर कायम रुळावे आणि बुद्धी काम करतेय तोपर्यंत मातृभाषेतच विचार करण्याचा आशीर्वाद लाभावा एवढीच इच्छा!
मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या साहित्यामुळेच हा योग आला, त्यांना वंदन व विशेष आभार! त्यांच्या खालील ओळी मनाला सतत आरसा दाखवत राहतील.
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।
- कुसुमाग्रज
वरती "पत्र लिहिण्यास कारण की" मुद्दामच लिहिलं नाही.. खाली देखिल "लोभ असावा" लिहिणार नाही. आईला पत्र लिहायला कारण का हवं? आणि लोभ असावा असं लिहिणं मुळातच चुकीचं आहे. तुझ्या लोभामुळेच तर आज इथवर आलो आहे. आता उगीच लांबवून गोडवा कमी नको करायला!
- तुझाच मी,
अक्षय सतीश गुधाटे
टीप:
पत्राखाली मी नाव जरी माझं लिहिलं असलं तरी हे पत्र, सर्वांच्या वतीने आहे. हे पत्र लिहिण्यात, त्याचा मजकूर तयार करण्यात, माझी मैत्रीण "नेहा गावडे" हीचा सिंहाचा वाटा आहे. तिचे विशेष आभार!