विरुपिका - विंदा करंदीकर | Virupika - Vinda Karandikar | Marathi Book Review

विरुपिका-विंदा-करंदीकर-Viroopika-Vinda-Karandikar-Marathi-Book-Review
पुस्तक विरुपिका कवी विंदा करंदीकर
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ९३ मूल्यांकन ५ | ५

विंदांच्या कविता काळजाला भिडणाऱ्या तर आहेत.. पण त्या आधी त्यातून काहीतरी सामाजिक बाजू.. समस्या.. त्रुटी.. चुका.. सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे. "विरुपिका" हा कवितासंग्रह त्याचा एक उत्तम नमुना आहे. विरुपिका या नावातच अनेक गोष्टी विंदा सांगून जातात. विरुपाचे अशा प्रकारचे दर्शन फक्त आणि फक्त विंदांच घडवून आणू शकतात. यातील अनेक कविता कधी विसंगतीचा आधार घेतात.. तर कधी कडवट विनोदाचा आधार घेऊन येतात. काही कवितांनी अतिशयोक्तीचा तर काहीनी विडंबनाचा आश्रय घेतला आहे. कधी विक्षिप्तपणा तर कधी उपरोधात्मक होऊन अनेक विषय आपल्या समोर येतात.

या कवितांमधून अनेक शाब्दिक कोट्या पाहायला मिळतात. सोबतच विंदांच्या कल्पनाशक्तीची आपल्याला प्रचिती येते, त्यात दडलेल्या जाणिवा तीव्र होतात. हा काव्यप्रकार विंदांनी जन्माला घातला आहे. त्यावर त्यांचा असा खास ठसा आपल्याला उमटलेला आढळतो. तो हळूच अहंकाराला घेतलेला चिमटा आपल्याला जाणवतो. या कविता जरा लहान आहेत पण त्यातला आशय मात्र गहन गूढ आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ देखील आपल्याला आकर्षित करते आणि हाच तिरकसपणा सूचित करते.

मला आवडलेल्या काही विरुपिका.. "ती, जामीन, खरा प्रकार, एकटा, पुतळा, तरुणपणी, मूलभूत हक्क, पायपीठ, श्रद्धा, निकराची आत्मनिष्ठा, सुपारी, चमत्कार, काहीतरी चुकते आहे, अहंभाव, उतरतीवर उगवणारी सत्यें, ट्रंक, भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत, तरुण मित्रांनो, कुंडलिनी, क्रांती वगैरे, पास, २८ जानेवारी १९८०, गजर, नालन्याय, मतभेद, मधुचंद्र" वानगीदाखल त्यातील दोन मी खाली देत आहे.

तरुणपणी

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये

लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य

त्यामुळे

दर्याची उंची किती वाढली

हे मोजण्यात खर्ची घातले.

मूलभूत हक्क

तुम्ही

चाबकाचा फटका मारण्यापूर्वी

त्यांनी

मारलेल्या फटक्याचा वळ

मावळू शकेल

इतकी सवड

मध्यंतरी मिळणे,

हाच त्याचा

एकमेव मूलभूत हक्क.

पहिल्या कवितेत विंदांनी काही लोक अगदी थोडसं काम करून देखील त्याच गाजावाजा करतात आणि स्वतः खूप मोठे काम केले आहे हे सांगत सुटतात, त्यांच्यावर विंदांनी थेट परंतू विनोदात्मक शेरा केला आहे. दुसऱ्या कवितेत समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध.. पिळवणुकीविरुद्ध.. उपरोधक पण मोजक्याच शब्दांत, ताशेरे ओढले आहेत.

मला असं वाटतं, विरुपिका म्हणजे विंदांच्या उपरोधक विनोद बुद्धीचा काल्पनिक चमत्कार!

अशा कविता तुम्हाला का आवडणार नाहीत. मला खात्री आहे तुम्ही स्वतः हे पुस्तक शोधाल.. विकत घ्याल.. आणि वाचून मला सांगाल.. की कविता खूप आवडल्या! याची खात्री मी घेतो.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form