राधेयकर्ण - वि. स. वाकासकर | Radheyakarn - Vi. Sa. Wakaskar | Marathi Book Review

राधेयकर्ण-वि-स-वाकासकर-Radheyakarn-Vi-Sa-Wakaskar-Marathi-Book-Review
पुस्तक राधेयकर्ण लेखक वि. स. वाकासकर
प्रकाशन वरदा प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ११८ मूल्यांकन ४.८ | ५

महाभारत म्हटलं की, अनेक चरित्र डोळ्यासमोर येतात. त्यात प्रामुख्याने कृष्ण, अर्जुन, दुर्योधन व महारथी दानवीर राधेय कर्ण यांचा समावेश आहे. महाभारत कर्णाशिवाय अपुरे आहे. अनेक लेखकांनी कर्णाचे चरित्र सविस्तर लिहीले आहे. परंतू त्यात प्रामुख्याने कर्णाचे उदात्तीकरण झाले असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. माझ्या वाचनात आलेली, अशीच काही महत्त्वाची पुस्तकं म्हणजे.. "मृत्युंजय", "राधेय" या अतिशय सुंदर कादंबऱ्या, "कौंतेय" हे नाटक व "रश्मिरथी" हा काव्यसंग्रह. ही सर्वच पुस्तकं एका विशेष हेतूनी लिहिलेली आहेत. त्यातून आपल्याला कर्णाच्या अनेक गोष्टी समजात, मनोरंजन होते परंतू त्या सर्व गोष्टी व्यासांच्या महाभारतात मात्र आढळत नाहीत. कर्णाचे खरे चरित्र कसे होते? नक्की व्यासांनी त्याचे कसे वर्णन केले आहे? याच उत्कंठेतून.. अनेक प्रश्नांच्या संदर्भात माहितीसाठी शोधमोहीम करताना "वि. स. वाकासकर" यांनी लिहिलेलं "राधेयकर्ण" हे पुस्तक हाती आलं आणि मोहीम सफल झाली.

हे पुस्तक म्हणजे नवणीत आहे. फक्त आणि फक्त उपयोगी आणि ज्या ज्या पर्वात कर्णाबद्दल महाभारतात बोलले गेले आहे, त्याचा संदर्भ आला आहे. तेवढेच या पुस्तकात लेखकाने संवाद स्वरुपात मांडले आहे. हे पुस्तक म्हणजे प्राचीन काळातील घटनांचे अर्वाचीन विश्लेषण असे मला वाटते. साजेशी भाषा, उपयुक्त माहिती, आणि मोजकेच परंतू सत्यता पडताळून घेतलेले घटक व त्या आधारित लिहलेले हे पुस्तक नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.

कर्णाचे इतर पात्रांसोबत असणारे संबंध.. कृष्ण, कुंती, अर्जुन, दुर्योधन, भीष्म, शल्य यांच्यातील संवाद अगदीच परखडपणे मदले आहेत. कोठेही उगीच वाढवलेली शेपटी नाही यामुळे पुस्तक अभ्यासावे असे झाले आहे. जे आहे ते. यात घडलेल्या काही घटनांचा आढावा घेऊन कर्णाचे वय शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. अर्जुन युधिष्ठिर वाग्युद्ध देखील  अतिशय रोचक प्रसंग कसा निर्माण झाला हे यात दाखवले आहे. "एस. एल. भैरप्पा" यांनी जसे "पर्व" या पुस्तकातून मानवी स्वरूपातील महाभारताचा आढावा घेतला होता.. तसाच मानवी शरीराला शक्य आहे असेच प्रसंग यात सांगितले आहेत. कर्ण हे काल्पनिक चरित्र नसून ऐतिहासिक व्यक्ती आहे या भावनेतून हे पुस्तक लिहिलं आहे.

या सर्वांसोबत कर्णाच्या चरित्राचे, विविधांगी विश्लेषण, स्वतःच्या मोजक्या शब्दात केले आहे. समकालीन संदर्भ, प्रथा, कर्णाचे वय, त्याचा वंशवृक्ष, चातुर्वर्णीय वर्णव्यवस्था, कर्णाची असभ्याता, मित्रप्रेम, आणि पूर्वीच्या अभ्यासाकांकडून झालेल्या काही स्पष्ट चुका इथे सविस्तर माहितीनुसार लिहिल्या आहेत.  कर्णाची युद्धसामग्री.. त्याची शैली व सेनापती म्हणून योग्यता याचे बारीक अभ्यासपूर्ण भाष्य आपल्याला पुस्तकाच्या प्रेमात पाडते. अगदी छोटेखानी परंतु विशेष लक्ष द्यावे असे पुस्तक. अनेक दिवसांची खरे कर्णचरित्र समजून घ्यायची इच्छा या पुस्तकामुळे पूर्ण झाली. संग्रही असणाऱ्या महाभारतावरील अनेक पुस्तकांमधील सर्वात उत्कृष्ट पुस्तक आहे असे मला वाचताना नेहमी वाटत होते. तुम्हाला जर सत्य समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की तुमच्याकडे हवेच! पुस्तक वाचून तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form