बांधावरच्या बाभळी - ग. दि. माडगूळकर | Bandhawarchya Babhali - Ga. Di. Madgulkar | Marathi Book Review

बांधावरच्या-बाभळी-ग-दि-माडगूळकर-Bandhawarchya-Babhali-Ga-Di-Madgulkar-Marathi-Book-Review
पुस्तक बांधावरच्या बाभळी लेखक ग. दि. माडगूळकर
प्रकाशन साकेत प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १४२ मूल्यांकन ४.४ | ५

गदिमा म्हटलं कि, "गीत रामायणाची" आठवण येते. माडगूळकर हे नाव मराठी माणसाने ऐकले नसेल तर नवलच वाटेल. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे, ज्यांनी अनेक सुंदर गीते, कविता आपल्याला दिल्या. परंतु त्यांनी लिहिलेल्या कथा देखील तितक्याच सुंदर, अर्थसंपन्न, आणि आशयगर्भित आहेत. त्यांनी तेवढ्याच ताकदीने कथा देखील लिहिल्या आहेत, याची प्रचिती तुम्हाला हे पुस्तकं वाचताना येईलच. सुबक असे मुखपृष्ठ. पुस्तकातीलच एका कथेचा आधार घेऊन बनवलेले चित्र.. साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या पानांची गुणवत्ता उच्च प्रतीची आहे आणि त्याचमुळे पुस्तक पाहताक्षणी हातात घेऊन वाचू वाटते.

गदिमा म्हणजे भाषा व शब्दांची निवड इतकी बिनचूक असते की, प्रत्येक कथा हळू हळू आपल्या समोर पात्रांसहीत उभी राहू लागते. त्यातील संवाद आपल्यासमोर घडताहेत असे भासते. एकूण तेरा कथांचा हा अप्रतिम कथासंग्रह आहे. त्यातील या काही कथा.. "बांधावरच्या बाभळी, दृष्टी, नट, पुरषाची आई, औषधी" मनाला भावणाऱ्या आहेत. समाजाच्या विविध घटकांची, त्यांच्या परिस्थितीची त्यांनी या कथांमध्ये घेतलेली नोंद रोचक आहे.

रामू चौलगे त्याच्या मनातील इर्षा व त्यातून ओढवलेली परिस्थिती.. तांबडी आजी व तिच्या आठवणी.. वस्ताद ज्ञानू पवार त्याला लाभलेली व त्याकडून हिरावून घेतलेली दृष्टी.. कष्टाळू वृत्ती लेखकाने किती सहज साध्या भाषेत व्यक्त केली आहे. त्यात अगदी हुशार चोर गण्या आहे.. सरला जोशी व तिच्या चित्रपटाची चालणारी गोष्ट कमाल आहे. सदाच्या नट असण्याची एक मनाला भेडसावून सोडणारी मिळालेली पावती तुम्हाला थक्क करते. पुरषाची आई.. तिच्या आयुष्यातील खदखद.. एकाच वेळी कशी ती भव्य होते व दुसऱ्या क्षणाला कशी खुजी होते हे वाचताना आपल्याही मनात उचंबळून येते. श्यामरावला मानवलेली औषधी तितकीच जालीम आहे. इतक्या बहुढंगी पात्रांची विविधांगी विश्लेषण वाचून तुम्हाला पुस्तकात रमायला होईल.

हे पुस्तक वाचण्याचे प्रमुख कारण गदिमा तर आहेतच पण यातून मिळणारे बोध.. सामान्य माणसाच्या आयुष्याचे अनेक पैलू, त्यातील त्यांच्या प्रतिक्रीया आपल्याला समृध्द करतात.  कुठेही प्रवासात हे पुस्तक मी पुन्हा वाचू शकतो. तुम्ही हे पुस्तक वाचले असेल तर तुम्हाला यातली सर्वात आवडलेली गोष्ट कोणती? कोणत्या पात्राचा तुमच्यावर प्रभाव पडला आम्हाला नक्की कळवा!!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form