गणगोत - पु. ल. देशपांडे | Ganagot - Pu. La. Deshpande | Marathi Book Review

गणगोत-पु-ल-देशपांडे-Ganagot-Pu-La-Deshpande-Marathi-Book-Review
पुस्तक गणगोत लेखक पु. ल. देशपांडे
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २०९ मूल्यांकन ४.७ | ५

पु. ल. देशपांडे हे नाव ऐकलं की ओठांवर नकळत हसू येतं, तसं त्यांच्या गणगोत या पुस्तकाचं नाव ऐकलं की मनात एक वेगळाच आपुलकीचा भाव उमटतो. आपल्यापैकी बहुतांश लोकांचा शालेय वयातच त्यांच्या लेखनाशी परिचय झालेला असणार. कुठं "असा मी असामी" मधल्या व्यक्तिचित्रणांतून, कुठं "व्यक्ती आणि वल्ली" मधल्या विलक्षण पात्रांतून पुलंनी आपल्याला, वाचनविश्वाला समृद्ध केलेलं आहे. पण गणगोत मात्र या सर्वांहून वेगळं आहे. यात पु. लं.नी आपल्या आयुष्यात भेटलेल्या माणसांची, आप्तेष्टांची, मित्रांची, नातलगांची अशी एक गोड, खुमासदार, मनाला भिडणारी माणुसकीची माळ गुंफली आहे की आपल्यालाही ही माणसं आपलीच वाटायला लागतात.

गणगोत वाचताना जाणवतं की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एक अध्याय घेऊनच येतो. काही लोक कायमचे सोबत राहतात, काही क्षणभर भेटतात, पण जीवनावर मात्र खोल छाप उमटवून जातात. लेखकाने या सगळ्या लोकांना किती बारकाईने पाहिलं आहे याची कल्पना हे पुस्तक वाचताना आपल्याला येते. एखाद्याच्या बोलण्यातली ढब, एखाद्याच्या जगण्याची धडपड, कुणाच्या स्वभावातलं वेगळेपण हे सगळं पु. लं.नी इतक्या सहजतेने शब्दबद्ध केलं आहे की वाचताना आपणही त्या सगळ्यांच्या सहवासात आहोत असंच आपल्याला वाटतं.

साहित्यप्रकार म्हणून हे चरित्र-रेखाटन असलं तरी प्रत्येक रेखाटनात लेखकाचा विलक्षण विनोदबुद्धीचा स्पर्श, भावुकतेची छटा आणि मानवी मनाविषयी असलेली जाण आपल्याला त्या सगळ्या पात्रांच्या खुप जवळ घेऊन जाते. कुणी साधा दुकानदार, कुणी शेजारी, कुणी नातेवाईक अशा साध्या माणसांचं असं सुंदर शब्दचित्रण मराठी साहित्यात क्वचितच आपल्याला आढळून येतं. पु. लं.च्या लेखनाची खासियत म्हणजे ते आपल्याला आयुष्याचा आरसा दाखवतात ज्यामध्ये आपल्याही आयुष्याच प्रतिबिंब आपण पाहू शकतो. तसेच आपण ज्या लोकांमध्ये वाढतो, राहतो त्यातलं सारं या आरशातउमटलं आहे. म्हणूनच गणगोत वाचताना सतत वाटतं “अरे! हा तर माझ्या आयुष्यातलाच माणूस आहे.” आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.

माणसाला महान होण्यासाठी मोठमोठी पदं, कीर्ती, संपत्ती लागत नाही. त्याच्या जगण्यातलं साधेपण, त्याची मनमिळावू वृत्ती, त्याची सोबत हेच त्याला या जगात अविस्मरणीय करून जातं. असाच काहीसा संदेश पुलंनी आपल्याला गणगोत मधून दिला आहे. पुलंना भेटलेले रावसाहेब, हिराबाई, बाबासाहेब पुरंदरे, विनोबा, आप्पा, बाय आपल्याही मनात घर करून जातात. आपले कोणीही नसताना ही माणसे आपले आप्त असल्यासारखे भेटतात. चार प्रेमाच्या, उपदेशाच्या गोष्टी सांगून पुढच्या प्रवासाला निघून जातात.

त्यामुळे तुम्ही जर अजून गणगोत वाचलं नसेल, तर नक्की वाचा. हे पुस्तक तुमच्या आठवणीतल्या अनेक माणसांना शब्दरूप देईल आणि नकळत का होईना, तुमचं स्वतःचं आयुष्य अधिक समृद्ध करील असं मला वाटतं. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला जे वाटलं ते आम्हाला नक्की सांगा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form