पुस्तक | मी माणूस शोधतोय | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १४० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
कधी कधी असं वाटतं की आपण एखाद्या विचाराच्या, आठवणीच्या, किंवा फक्त एका नजरेच्या मागे चालत चालत, अंतहीन प्रवासाला लागतो. मी माणूस शोधतोय वाचताना अगदी असंच वाटत राहतं. जसं आपण एकटं नसतो, आपल्या मनात कुणीतरी चालत असतो. कुणीतरी आपल्याला शोधतोय... किंवा कदाचित आपणच स्वतःला. वपुंच्या लेखणीतली सहजता, पण तितकीच अस्वस्थ करणारी विचारांची खोली... प्रत्येक कथेला एक नवा चेहरा देते, आणि आपण त्या चेहऱ्यातून स्वतःचा शोध घ्यायला लागतो.
या कथांमध्ये एक सामायिक धागा आहे.. ते म्हणजे "माणूसपण". हे पुस्तक म्हणजे एका लेखकाचं, आणि त्याचबरोबर एका मनुष्याचं, हळूहळू स्वतःभोवती विणत गेलेलं अनुभवांचं, नात्यांचं, वेदनांचं आणि शोधाचं एक तलम वस्त्र आहे. यातल्या पात्रांमध्ये कोणतंही मोठेपण नाही, पण त्यांचं सामान्य असणंच इतकं असामान्य वाटतं की आपण त्यांच्यात हरवून जातो. व. पु. म्हणतात तसं, “मी कुणाचा शोध घेतोय, की स्वतःचाच?” – हाच प्रश्न प्रत्येक वाचकाच्या मनात घर करून जातो.
मला नेहमीच असं वाटतं की, वपुंच लेखन, हे फक्त ‘कथा’ लिहिणं नसतं.. ते स्वतःच्या मनाचा आरसा वाचकासमोर ठेवतात. त्यांची शैली... ना फार अलंकारिक, ना फार त्यात वखवख.. पण त्यात एक अशी झिरपणारी संवेदनशीलता आहे की, साधं वाक्यसुद्धा आपल्याला शांततेत बसून विचार करायला भाग पाडतं. मी माणूस शोधतोय हा केवळ कथासंग्रह नव्हे, तर तो एक अनुभूतीचा संग्रह आहे, अनुभवांचं गाठोडं आहे. प्रत्येक कथा म्हणजे एक छोटासा आरसाच आहे, ज्यात आपण स्वतःच्या आयुष्यातल्या, विसरलेल्या नात्यांचं प्रतिबिंब पाहतो.
या कथांमध्ये काहींना प्रेम गवसतं, काहींना विरह; काही जण स्वतःलाच हरवतात, तर काही स्वतःला सापडतात. पण या सगळ्यांच्या मागे एक गोष्ट सतत जाणवत राहते.. प्रत्येकजण कुणाच्या न कुणाच्या मायेच्या उबेसाठी तहानलेला आहे. आणि या शोधात तो कधी खोटं हसतो, कधी रडतो, कधी समजुती करतो... पण शेवटी तो माणूस राहतो. कधी ना कधी आपल्यालाही असंच वाटलेलं असतं.. की “मी कुणालातरी शोधतोय… कुणा नात्यात, कुठल्या आठवणीत… की फक्त स्वतःच्याच एकटेपणात?”
मी माणूस शोधतोय हे पुस्तक वाचल्यावर ते तुमच्या आत कुठेतरी घर करून राहतं. ते शब्दातून सुटत नाही, ते शेवटाच्या पानानंतरही वाचलं जात राहतं. तुमच्या आठवणीतून, तुमच्या नात्यांमधून, आणि तुमच्याच नकळत तुमच्या एकटेपणातून. प्रत्येकाच्या संग्रही असावं असं एक पुस्तक.. जे फक्त वाचायला नाही, तर जगायला शिकवतं.