पुस्तक | काळेकरडे स्ट्रोक्स | लेखक | प्रणव सखदेव |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २१८ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते कदाचित; मात्र दुःख म्हटलं की, प्रत्येकाचीच सामान अनुभुती असते, असं मला वाटतं. बहुतेक म्हणूनच समदुःखी हा शब्द आहे.. समसुखी नाही. अशाच एका सामान दुःखाचा दुआ घेऊन एक कथा समोर येते. "काळेकरडे स्ट्रोक्स" लेखक "प्रणव सखदेव" या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा ब्लर्ब वाचूनच मनातली हुरहूर वाढते.. चित्त आतल्या पानात वळते.. आणि मनातली विचारांची पोकळी बुध्दीला अस्वस्थ करू लागते.. पुस्तकाच्या पानांमध्ये नक्की काय दडले आहे या विचाराने. पुस्तक हातात येतं आणि पानांमागुन पानं उलटली जातात.. एक एक वाक्य तुमच्या आठवणींचा पसारा मांडून बसतं.. आणि कधी कथेचा शेवट घेऊन समोर येतं समजत सुद्धा नाही.
या पुस्तकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. रोजच्या व्यवहारातील भाषा.. संवादातून समोर येणारे प्रसंग.. निवडक परंतू, प्रभावी पात्र.. गुंतागुंतीचे नातेसंबंध.. आणि प्रेमकथेला असणारी दुःखाची किनार.. प्रत्येक वाचकालाच विचारांच्या कोलाहलात गुंतवण्याची ताकद.. आणि या सर्वातून जन्माला येणारी सामान्यांची दुःखं.. यांचं रसायन पुस्तकाला वाचकाच्या मनात उतरवते.. कथा आपलंस करून टाकते. प्रसंगी बोल्ड असणारी भाषा काहींना खटकू शकते.. पण मला मात्र ती पात्रांशी असणारे संबंध सांगण्यासाठी गरजेची वाटली. त्या भाषेचा प्रभाव.. कथेच्या अव्यक्त घटनांना ऐरणीवर आणतो. अस्ताव्यस्त कथेची अनिश्चित साचेबद्धता तुम्हाला भूल घालते.
मूलतः समीर, सलोनी आणि सानिका यांवर आधारित कथा.. इतर पात्रानांही (चैतन्य, अरुण, दादुकाका) तितकीच महत्वाची भूमिका देते. तिचा पोतदेखिल प्रेमापासून बदलत जातो.. नावाप्रमाणेच प्रत्येकाच्या आत असणाऱ्या पोकळीतल्या कृष्णविवरात उमटलेले हे काळेकरडे स्ट्रोक्स.. ते स्ट्रोक्स एकट्याचे नाहीयेत असे जाणवते.. त्यात प्रामुख्याने वाचकाचा प्रवास दडलेला आहे. समीरची कथा.. अनेक प्रसंगांसोबत.. अनेक ठिकाणाहून पुढे जाते. त्यातील गूढ, संबंधित भाषा, इतकी चपखल आहे की वाचताना आपण गुंग होऊन जातो. सोबतच दिलेल्या निसर्गाच्या उपमा.. भावनांची तीव्रता वाढवते. काही भावना या कवितेतून येतात.. त्या जितक्या मुक्त आहेत.. तितक्याच भावनाप्रधान. बालकवींच्या "औदुंबर" कवितेचा आशय इतक्या सुंदर प्रकारे गुंफला आहे की, कविता नव्याने समजलेच परंतू ती किती सर्वव्यापी आहे.. कालातीत आहे याचीही जाणीव होईल.
प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.. चौकटीच्या बाहेर बघायला भाग पाडणारं.. नवीन पायंडा पडलेलं हे पुस्तक आहे. दुःखाचेच असणारे अनेक भाग. कॉलेजच्या काही गोष्टी.. भविष्याच्या गप्पा.. कोणालाच न चुकणारा संघर्ष.. वेदना.. द्वेष.. आणि नव्या आशा.. नवी उमेद.. व काही पूर्ण, काही अपूर्ण स्वप्ने. लेखकाच्या प्रामाणिक लेखणीतून उतरलेली ही समृध्द कथा आहे. वास्तववादी तरुणाईने अवश्य वाचावे असे पुस्तक. प्रेमातील व्यापकता.. नाजूकता.. यातून फुलणारे झाड.. मित्रांच्या सहवासात त्याला फुटलेले आकर्षणाचे फाटे.. आणि सोबतच मोह व वासनेतून त्याची बळकट होणारी अदृश्य मुळं.. प्रत्येकानं अनुभवलेलं स्वतःचं असं औदुंबराचं झाड सापडेल. अवश्य वाचा.. आणि तुमचा विस्तृत अभिप्राय आम्हाला कळवा.. या पुस्तकाने तुमचे कोणते सुप्त दुःख गोंजारले?